हिंगोली - जिल्ह्यातील कनेरगाव नाका येथील संगमेश्वर संस्थान परिसरात रविवारी भागवत सप्ताहाचा समारोप होता. यानिमित्त यात्रा भरली होती, यात्रेत लहान मुलांसाठी मिकी माऊससह विविध प्रकारचे खेळणे दाखल झाले होते. या मिकी माऊसवर ५ मुले खेळत असताना, अचानक वेगाने वारे आल्यामुळे मिकी माऊस १०० फूट वर उडाले अन जोरात खाली आदळले. त्यामुळे एका मुलाचा जागीच मृत्यू झाला तर, चौघेजण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना दुपारच्या सुमारास घडली. मनोहर राघोजी मोरे (वय १०), असे मृत चिमुकल्याचे नाव आहे.
कनेरगाव नाका येथील संगमेश्वर संस्थानामध्ये भागवत सप्ताह निमित्त आज समारोप होता. या समारोपानिमित्त मोठ्या प्रमाणात भाविकांची या ठिकाणी गर्दी झाली होती. तर येथीलच कर्ममेळा वस्तीगृहातील विद्यार्थी दुपारी बाराच्या सुमारास शाळा सुटल्यानंतर पैनगंगा नदीच्या तिरावर असलेल्या संगमेश्वर संस्थान सप्ताहाचा महाप्रसाद घेण्यासाठी गेले होते. या चिमुकल्यांनी महाप्रसाद घेतला आणि मिकी माऊसवर खेळण्यासाठी गेले. दरम्यान, अचानक सुसाट वेगाने आलेल्या वाऱ्यामुळे मिकी माऊस जवळपास १०० च्या वर हवेत उडाले. एकच आरडा ओरड झाला. तर मिकी माऊस गतीने जमिनीवर आदळल्याने मनोहर या मुलाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
या जखमींमध्ये प्रवीण राघोजी मोरे (वय १२), शिवाजी देविदास जहरव (वय ११), हे सेनगाव तालुक्यातील बाभूळगाव येथील रहिवासी आहेत. तर, करण रमेश धुळे (वय १३, रा. शेंबाळपिंपरी, ता. उमरखेड) या तिघांचा मुक्काम हा कनेरगाव नाका येथील कर्ममेळा येथेच आहे. तर, डिंगाबर माधव बर्वे (वय ६, रा. मोप) या जखमी बालकांवर वाशिम येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी कनेरगाव नाका चौकीमध्ये नोंद केली.