हिंगोली - जिल्ह्यात ३०० च्या वर कुक्कुटपालन व्यावसायिक आहेत. अफवेमुळे अनेक व्यावसायिकांनी आपल्या जिवंत कोंबड्या पुरल्या होत्या. त्यामुळे शेड रिकामे झाले आहेत. मात्र, चिकन खवय्यांचे डोळे उघळले असून चिकन खाल्ल्याने कोरोना होत नाही, हे त्यांना पटले आहे. त्यामुळे चिकनची मागणी वाढली आहे. सद्यस्थितीत १८० ते २०० रुपये किलोप्रमाणे चिकनची विक्री केली जात आहे. त्यामुळे व्यावसायिकांवर पश्चाताप करण्याची वेळ येऊन ठेपली आहे.
जिवंत कोंबड्या आणि पिल्ले पुरली होती खड्ड्यात
जगभरात थैमान घातलेल्या कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सुरुवातीला हा कोरोना चिकन खाल्ल्याने होते, अशी अफवा अफवा सोशल मीडियावरून पसरवण्यात आली होती. इतकेच नाहीतर चिकन खव्वयांचा विश्वास बसावा, यासाठी काही व्हिडिओ देखील अपलोड करम्यात आले होते. त्यामुळे कुक्कुटपालन व्यवसायावर मोठा परिणाम झाला होता. त्यामुळे धास्तावलेल्या व्यावसायिकांनी नगावे होणारी कोंबडीची विक्री डझनाने केली होती. अनेकांनी १० आणि ५ रुपये आणि फुकटही कोंबड्या वाटल्या होत्या. त्यामुळे संघटनेच्यावतीने कुक्कुटपालन व्यावसायिकांना नुकसान भरपाईची मागणी केली होती. मदत मिळण्याची काहीही चिन्हे दिसले नाही. त्यामुळे कोंबड्यांना खाद्य कसे पुरवावे? असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला होता. खाद्याविना आपल्या कोंबडी आणि पिल्लांचे हाल पाहवत नसल्याने अनेकांनी जिवंत कोंबड्या आणि पिल्ले खड्ड्यात पुरली. मात्र, आता चिकन खवय्यांचे डोळे उघडले असून कोंबड्यांपासून कोरोना होतो, ही अफवा असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे आता चिकनची मागणी वाढली आहे.
बिकट परिस्थितीत कोंबड्या जगवणाऱ्यांना 'अच्छे दिन'
काहीजणांनी बिकट परिस्थितीमध्ये देखील कोंबड्या जगवल्या. आता चिकनची मागणी वाढल्यामुळे त्यांना 'अच्छे दिन' आले आहेत, तर कुक्कुटपालन व्यवसायिकांनी कोरोनाच्या अफवेला बळी पडून आपल्या शेडमधील जिवंत कोंबड्यांची विल्हेवाट लावली. त्यांचा मात्र आता चांगलाच हिरमोड होत असल्याचे पाहायला मिळत आहे.
सद्यस्थितीत 180 ते 200 रुपये प्रति किलो प्रमाणे चिकनची विक्री होऊ लागली आहे. लॉकडाऊनमुळे एक दिवसाआड जिल्ह्यात बाजार पेठ खुली केली जात आहे. अशाही परिस्थितीत चिकन खवय्ये चिकन खरेदीसाठी चिकन सेंटरवर तुटून पडत आहेत. ज्या कुक्कुटपालन व्यावसायिकांना त्या काळात थोडी झळ सहन करणे शक्य झाले नाही, त्यांच्यावर आता पश्चाताप करण्याची वेळ आली आहे. तसेच झालेल्या नुकसानीची सरकारकडून काही भरपाई मिळेल या आशेवर दिवस काढत आहेत.