हिंगोली- हिंदू धर्मात मोक्ष प्राप्तीसाठी मृत्युपश्चात केल्या जाणाऱ्या अंतिम संस्काराला महत्व प्राप्त आहे. तो चांगला पार पाडण्यासाठी बऱ्याच गावात स्मशानभूमीमध्ये सोयी सुविधा केल्या जातात. यामध्ये स्मशानभूमीत जाणारे रस्ते दुरूस्ती, वृक्षारोपण केले जाते. मात्र, कळमनुरी तालुक्यातील सोडेगाव या गावातील स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यात चिखल झाल्याने मृतदेह चिखलातून स्मशानभूमीत नेण्याची वेळ नागरिकांवर येत आहे.
कळमनुरी तालुक्यातील सोडेगाव येथे गावापासून काही अंतरावर स्मशानभूमी आहे. या स्मशानभूमीत जाण्यासाठी रस्ता नाही. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले असल्याने ये-जा करणे फारच जिकरीचे बनले आहे. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल साचला आहे. याच चिखलमय रस्त्यावरून मृतदेह नेतांना नागरिकांचे हाल होत आहेत.
प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी -
हिवाळ्याच्या दिवसात रस्त्यावर चिखल साचल्याने, नेमकं अंत्यसंस्कारासाठी कसं जायचं? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. त्यामुळे प्रशासनाने लक्ष देवून स्मशानभूमीत जाणारा रस्ता बांधावा, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.
शेतातून काढावा लागतोय मार्ग-
स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. या रस्त्यावरून एकट्या माणसालाही चालता येत नाही. त्यामुळे स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या शेतातून मार्ग काढण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे.
हेही वाचा- महाराष्ट्रातील गुंतवणूक उत्तर प्रदेशात नेण्याचा भाजपाचा कुटील डाव - सचिन सावंत
हेही वाचा- आमदार प्रताप सरनाईक व विहंग सरनाईक या दोघांना ईडीचे समन्स