हिंगोली- मंदिरे बंद, उघडले बार, उद्धवा धुंद तुझे सरकार, आशा प्रकारची घोषणाबाजी करीत भक्तांसाठी राज्यातील मंदिरांची दारे उघडण्याची मागणी भाजपा अध्यात्मिक समन्वय आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आज आघाडीच्या वतीने आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या ओंढा नागनाथ येथील नागनाथ मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर लाक्षणिक उपोषण केले. तसेत, नागनाथ मंदिर सुरू करण्याची मागणी केली.
संपूर्ण राज्यातील मंदिरे बंद असल्याने, अनेकांचे मोठे नुकसान होत आहे. प्रत्येक मंदिरा समोर वा परिसरात बऱ्याच लघू व्यावसायिकांना रोजगार उपलब्ध होत होता, तसेच, मंदिरात दर्शन करण्यासाठी किंवा मंदिराच्या सजावटीसाठी मुबलक प्रमाणात फुलांचा वापर केला जायचा. यातून अनेकांना रोजगार तर मिळतच होता, सोबतच शेतकऱ्यांच्या फुलांना मागणी वाढत होती. मात्र, सरकारने मंदिरे बंद ठेवून, दारूची दुकाने सुरू करून, तळीरामांना दिलासा दिला. मात्र, देवापासून भक्तांना दूर ठेवले. त्यामुळे, भक्तांचा हिरमोड झाल्याची भावना आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष अॅड शिवाजी जाधव, माजी आमदार गजानन घुगे, भाजपा संयोजक शरद पाटील आदी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
हेही वाचा- महिला अत्याचाराच्या घटना थांबवा; हिंगोलीत भाजपा महिला मोर्चा आघाडीचे आंदोलन