हिंगोली - दिवसेंदिवस महागाईने कळस घाठला आहे. या महागाईच्या चटक्याने सर्वसामान्य होरपळून निघत आहेत. अशा परिस्थितीमध्ये सर्वसामान्यांना वाढीव वीजबिल दिल्याने भाजपा राज्यात आक्रमक झाले आहे. तर दुसरीकडे वाढते पेट्रोल आणि डिझेलचे दर हे वाहनधारकांना न परवडणारे असल्याने शिवसेनादेखील आक्रमक झाल्याचे पाहायला मिळतेय. दोन्ही पक्षाच्या वतीने हिंगोली येथे आंदोलन करण्यात आले.
वाहनधारक महागाईमुळे अडचणीत
शिवसेनेच्या वतीने काढण्यात आलेल्या गाडीबैल मोर्चामध्ये कळमनुरी विधानसभेचे आमदार तथा शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते. पेट्रोल दरवाढ ही वाहनधारकांची दिवसेंदिवस डोकेदुखीच बनली आहे. त्यामुळे नुकतेच कसेबसे कोरोनामधून सावरलेले वाहनधारक महागाईमुळे अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे पेट्रोल डिझेलचे दर हे कमी करावेत, या मागणीसाठी हिंगोली येथे शिवसेना आक्रमक झाली आहे. या मोर्चामध्ये जिल्हाभरातून असंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते.
सर्वसामान्यांना कितपत फायदा?
दुसरीकडे विद्युत महावितरण कंपनीने ग्राहकांना वाढीव वीजबिल दिल्यामुळे ग्राहक हे चांगलेच गोंधळून गेलेले आहेत. त्यामुळे हे वाढीव बिल कमी करावे, या मागणीसाठी भाजपाच्या वतीने विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले, या आंदोलनात जिल्हाभरातील कार्यकर्ते व नागरिक हे सहभागी झाल्याचे दिसून आले. आता दोन्ही आंदोलन एकापाठोपाठ केल्याने या आंदोलनाचा सर्वसामान्यांना कितपत फायदा होतो, याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे.
वीज भरण्यासाठी अवधी द्या - आ. मुटकुळे
कोरोनाचा फटका प्रत्येकाला बसला आहे. सर्वसामान्य लोकांचे सायंकाळचे जेवणाचे वांधे निर्माण झाले आहेत. हीच परिस्थिती व्यापाऱ्यांचीदेखील आहे. त्यानुसार त्यांना बिल भरण्यासाठी तगादा तर लावू नकाच वरून त्यांची वीजजोडणीदेखील तोडू नका, त्यांना बिल भरण्यासाठी अवधी देण्याच्या सूचना अभियंत्यास आ. तान्हाजी मुटकुळे यांनी दिल्या आहेत.
पेट्रोल दर वाढ कमी करा - आ. बांगर
पेट्रोल व डिझेलचे वाढते दर हे वाहनधारकांसाठी चांगलीच डोकेदुखी बनली आहे त्यामुळे पेट्रोल व डिझेलचे दर कमी करावेत, अशी मागणी कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर यांनी सरकारकडे केली आहे.