हिंगोली - दोन वर्षांपासून बंद असलेल्या मंदिराची दारे उघडण्याच्या मागणीसाठी आज (सोमवार) राज्यभर भाजपाच्यावतीने घंटा नाद करून, मंदिरे उघडण्याची मागणी केली. मात्र, मोठं मोठी मंदिरे सोडून भाजपच्यावतीने एका खेडेगावातील मंदिरासमोर आंदोलन करून संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले आहे.
आमदार मुटकुळे यांनी मंदिराचे दार उघडून घेतले दर्शन -
कोरोना महामारीमुळे गेली दोन वर्षे मंदिराचे द्वार हे भाविकांसाठी बंद आहेत. या बंद द्वारामुळे अनेकांच्या रोजगारावर गदा आलेली आहे. यामध्ये फुल व्यावसायिक, पुजारी एवढेच नव्हे तर फुल उत्पादक शेतकरी देखील चांगलेच अडचणीत सापडलेले आहेत. तसेच प्रसाद विक्रेते तर दुसरा व्यवसाय थाटण्यात तयारीत आहेत. त्यामुळेच निदान आता तरी मंदिराची दारे उघडावी. या मागणीसाठी भाजपाच्यावतीने संपूर्ण राज्यामध्ये घंटानाद आंदोलन करण्यात आली आहेत. त्याच पार्श्वभूमीवर हिंगोली विधानसभेचे आमदार तानाजी मुटकुळे यांनी सेनगाव तालुक्यातील पानकनेरगाव येथे माणकेश्वर मंदिराचे दार उघडून कार्यकर्त्यांसह आमदार मुटकुळे यांनी दर्शन घेतले. तर मंदिर परिसरात घोषणाबाजी करण्यात आली.
आंदोलन बनले चर्चेचा विषय -
हिंगोली जिल्ह्यात अनेक जागृत देवस्थान आहेत. यामध्ये ओंढा नागनाथ या देवस्थानाचा प्रथम क्रमांक लागतोय, विशेष म्हणजे जगभरात आठवे ज्योतिर्लिंग म्हणून औंढा नागनाथची ख्याती आहे. तसेच पोत्रा येथे मुक्तेश्वर महादेव मंदिर अशी अनेक मोठंमोठी मंदिरे आहेत. मात्र, भाजपाच्यावतीने केवळ ग्रामीण भागात अतिशय लहानशा खेड्यामध्ये मंदिराचे दार उघडल्याने या घंटानाद आंदोलन केले. हे आंदोलन संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय बनले होते.
हेही वाचा - मंदिर उघड बये मंदिर उघड; कोल्हापुरात बीजेपीचे आंदोलन