हिंगोली- जिल्ह्यातील कमळनुरी येथील जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात अर्धवट कापून फेकलेले अर्भक आढळले आहे. हे अर्भक एका साडीमध्ये गुंडाळून होते आणि त्याच्या कमरेखालचा भाग कापलेल्या अवस्थेत होता. तर अर्धवट भाग हा कुत्र्याने खाऊन टाकला होता. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी कळमनुरी पोलीस ठाण्यात अनोळखी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कळमनुरी येथील उपजिल्हा रुग्णालय परिसरात मोकाट कुत्रे कशाचा तरी लचका तोडत असल्याचे रुग्णालयात ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या लक्षात आले. या ठिकाणी कुत्र्यांची संख्या वाढतच होती. त्यामुळे, कुत्रे एक मेकावर धावून जात होते. मात्र, हे कुत्रे नेमकं काय तोडत आहेत हे काही नागरिकांनी जवळ जाऊन पाहाले असता ते नवजात अर्भक असल्याचे दिसून आले. त्यानंतर नागरिकांनी याबाबतची माहिती कळमनुरी पोलीस ठाण्याचे पो.नि रंजित भोईटे यांना दिली. त्यांनी इतर पोलीस कर्मचाऱ्यांसह तात्काळ घटनास्थळी धाव घेतली व अर्धवट अवस्थेत पडलेल्या त्या अर्भकाचा पंचनामा केला.
दरम्यान, अर्भकाचा कमरेखालील भाग कापलेल्या अवस्थेत आणि अर्धवट भाग कुत्र्यांनी खाल्ल्याने अर्भक नेमके पुरुष जातीचे की स्त्री जातीचे हे कळू शकले नाही. अर्भकाला उपजिल्हा रुग्णालयात ठेवण्यात आले आहे. मात्र, चक्क पुरावा नष्ट करण्यासाठी अर्भकाला अर्धवट कापणारी ती निर्दयी माता नेमकी कोण असेल या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या प्रकरणी कळमनुरी पोलीस ठाण्यात अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. तपास स.पो.उप.नी जाधव करीत आहेत. तर, जिल्हा शल्यचिकित्सकांनी कळमनुरी आणि हिंगोली येथील जिल्हासामान्य रुग्णालयात प्रसुती झालेल्या महिलांची माहिती मागविली आहे.
आरोपीने घटनास्थळी काहीही पुरावा सोडला नसल्याने त्या निर्दयी मातेचा शोध घेणे कळमनुरी पोलिसांसमोर आव्हानच आहे. तसेच अर्भक कापण्यापर्यंत मजल मारणाऱ्या निर्दयी मातेला हे टोकाचे पाऊल का उचलावे लागले ? याचा उलगडा मातेचा शोध लागल्यानंतरच होईल. दरम्यान, मन हेलावून टाकणाऱ्या या घटनेने कळमनुरी परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तर पोलीस शासकीय व खाजगी रुग्णालयाची कसून झाडाझडती घेत आहेत.
हेही वाचा- खासदार हेमंत पाटलांचे 'ते' पत्र बनावट; व्हायरल करणाऱ्यावर कारवाईची मागणी