हिंगोली - जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्ण संख्येत प्रचंड वाढ होत आहे. जिल्हा प्रशासनाला प्राप्त झालेल्या अहवालात आणखी 8 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये एका 22 वर्षीय गरोदर महिलेचा समावेश असून, इतर सात जणांचे देखील अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे आता जिल्ह्यात 259 एवढी कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 229 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर सद्यस्थितीत एकूण 30 रुग्णावर विविध कोरोना वार्डमध्ये उपचार सुरू आहेत.
कोरोनाबाधित रुग्णांमध्ये गरोदर महिला आणि राज्य राखीव दलाच्या जवानांचा ही समावेश आहे. गरोदर महिला ही ओंढा नागनाथ तालुक्यातील भोसी येथील रहिवासी आहे. तर राज्य राखीव दलाच्या जवानाला येलकी येथील क्वारंटाईन सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. तसेच कळमनुरी तालुक्यातील बाभळी येथील एका 38 वर्षीय व्यक्तीलाही कोरोनाची लागण झालीय. सदरील व्यक्ती हा नोयडा शहरातून कळमनुरी तालुक्यात परतलेला आहे. याचबरोबर मुंबईवरून परतलेल्या कवडा येथील 26 वर्षीय व्यक्तीचा ही कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
उर्वरीत 4 जण हे कळमनुरी शहरातील काझी मोहल्ला येथील रहिवासी आहेत. हे सर्व जण कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांच्या संपर्कात आले होते. या सर्वांना कोरोना वार्डमध्ये उपचारासाठी हलविण्यात आले आहे. विविध कोरोना केअर सेंटर, आयसोलेशल वार्ड आणि गाव पातळीवर केलेल्या क्वारंटाईन सेंटरमध्ये एकूण 594 कोरोना संशयित दाखल असून, 287 जणांचे अहवाल हे प्रयोगशाळेकडे प्रलंबित आहेत.