हिंगोली - जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून आत्महत्यांचे सत्र सुरू आहे. यातच पुन्हा एका कर्जबाजारी अल्पभूधारक शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज(सोमवार) उघडकीस आली आहे. दिलीप खुशालजी काळे (42) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. या प्रकरणी कुरुंदा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दिलीप काळे यांच्याकडे साडेतीन एकर शेती आहे. याच शेतावर त्यांचा संसाराचा गाडा चालायचा. मात्र, मागील दोन वर्षापासून निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतातील उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली. यंदाही परतीच्या पावसाने, शेतात असलेले सोयाबीन खराब झाले, हळद पण हातची गेली, कापूसही खराब झाला. अशा विदारक परिस्थितीत संसाराचा गाडा हकायचा तरी कसा, हा प्रश्न काळे यांना भेडसावत होता. गेल्या काही दिवसांपासून ते अस्वस्थ होते. यातच रविवारी घरी कोणी नसल्याचे पाहून त्यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
बाहेर कामानिमित्ताने गेलेले लोक जेव्हा घरी परत आले तेव्हा हा प्रकार समोर आला. याबाबत माहिती कळताच कुरुंदा पोलीस ठाण्याचे सपोनि सुनील गोपीनवार, जमादार जोगदंड यांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली. याप्रकरणी प्रभाकर काळे यांच्या फिर्यादीवरून कुरुंदा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तर अधिक तपास जमादार जोगदंड हे करीत आहेत.
हेही वाचा - पारधीवाड्यात तरुणाला भोसकले, 9 जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल