हिंगोली - जिल्ह्यामध्ये दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून, जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 4 हजार 83 वर पोहोचली आहे, तर 60 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या जिल्ह्यात 232 कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. हा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात आता 1 ते 7 मार्च या कालावधीमध्ये संचारबंदीची घोषणा करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी याबाबत माहिती दिली.
जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे, सध्या जिल्ह्यात कोरोनाचे 232 सक्रिय रुग्ण आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी तसेच कोरोनाबाधितांची संख्या अटोक्यात आणण्यासाठी येत्या 1 मार्चपासून ते 7 मार्चपर्यंत जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.
अत्यावश्यक सेवा राहणार सुरू
संचारबंदीच्या काळात अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत. त्यामध्ये दूध, मेडिकल, भाजीपाला अशा सेवेंचा समावेश असणार आहे. दरम्यान पेट्रोल पंप सुरू राहणार आहेत, मात्र त्यातून केवळ शासकीय वाहने, तसेच अत्यावश्यक सेवेसाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांनाच पेट्रोलपुरवठा करण्यात येणार आहे. तर या कालावधीमध्ये जिल्ह्यातील सर्व धार्मिक स्थळे, प्रार्थना स्थळे, सर्व शाळा, महाविद्यालय, मंगल कार्यालय बंद ठेवण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील बॅंका केवळ शासकीय कामासाठीच चालू राहणार आहेत. पत्रकारांना वार्तांकनासाठी बाहेर पडण्याची मुभा देण्यात आली आहे.