हिंगोली - शहरातील वांजरवाडा भागातील रहिवासी असलेल्या वैभव बांगरने पहिल्याच प्रयत्नात यूपीएससीत यश संपादन केले आहे. वडिलांनी आनंद व्यक्त करत मुलाने माझे स्वप्न पूर्ण केल्याचे सांगितले. त्यांना देशात ४४२ वी रँक मिळाली आहे. अवघ्या २२ व्या वर्षी वैभवने यश संपादन केल्याने त्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
वैभवला अगदी लहानपणापासूनच अधिकारी होण्याची इच्छा होती, तो अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगून तसा अभ्यास करत होता. वैभवने हिंगोली येथील विद्यानिकेतन स्कूलमध्ये आठवीपर्यंत शिक्षण घेतले नंतर पुणे येथील बी. के. बिर्ला कॉलेजमधून बारावीचे शिक्षण घेतले. त्यानंतर फर्ग्युसन महाविद्यालयातून बी.ए. ला प्रवेश घेतला अन् लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी सुरु केली. इकडे वडिल देखील आपला मुलगा अधिकारी होणारच या आशेवर मुलाला पाहिजे ती मदत करत होते. वैभव तब्ब्ल चार वर्षापासून रात्रंदिवस एक करीत अभ्यास करीत होता, चार वर्षाच्या खडतर प्नयत्नानंतर वैभवने यश संपादन केले.
हे ही वाचा -UPSC Topper Ria Dabi : 2015 बॅचची IAS टॉपर टीना डाबीची बहिण रिया डाबीचे UPSC परीक्षेत नेत्रदीपक यश
हिंगोलीत सत्कार -
वैभव बांगर याने लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश संपादन केल्याचे समजताच हिंगोली येथे बांगर कुटुंबीय व नातेवाईक, मित्र मंडळींनी जल्लोषात स्वागत केले. वैभवने जिल्ह्याचे नाव गाजवल्याचा अन् अवघ्या २२ व्या वर्षीच आमचे स्वप्न पूर्ण केल्याचे समाधान वैभवच्या वडिलांनी व्यक्त केलंय.
हे ही वाचा -अल्पदृष्टी असलेल्या कोल्हापुरातील आनंदा पाटील याचे UPSC परीक्षेत यश; 325 वी रँक
कुटुंबीयांच्या पाठबळानेच झाले शक्य -
अगदी लहानपणापासूनच अधिकारी होण्याचे स्वप्न होते, त्यामुळेच त्या दिशेने मी अभ्यास करत गेलो. अभ्यास करण्यासाठी वेळ मिळावा म्हणून बी.ए. ला प्रवेश घेतला अन स्वतः नोट्स काढत त्याचे वाचन करत गेलो. लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय सबंध हे विषय घेतले होते. अभ्यास करीत असताना घरच्यांचे खूप मोठे पाठबळ होते. त्यांनी मला अजिबात कसलीही कमी पडू दिली नाही. त्यांच्या या पाठबळामुळेच मला हे यश संपादन करता आल्याचे वैभव सांगतोय. तर स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्वच मित्रांना वैभवने सल्ला दिलाय की, कधीच जिद्द न सोडता स्वप्न उराशी बाळगून अभ्यास करा, यश हे आपोआप आपल्या पदरात पडतेच.