हिंगोली- आज 13 हजार लिटरच्या जम्बो सिलिंडरची उभारणी करण्यात आली आहे. यातून कोरोनाबाधित रुग्णांना ऑक्सिजन पुरवण्यात येत आहे. दरम्यान, ऑक्सिजन संपण्याच्या भीतीला आता पूर्णविराम लागला आहे. निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांच्या हस्ते या टँकचे उद्घाटन करण्यात आले.
कोरोनाबाधित रुग्णांसाठी ऑक्सिजनची नितांत गरज आहे. ऑक्सिजन संपू नये, यासाठी अतोनात प्रयत्न केले जात होते. ही बाब पालकमंत्री वर्षाताई गायकवाड यांच्याही लक्षात आणून देण्यात आली होती. याबाबत वर्षाताई गायकवाड यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. त्यानंतर जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी स्वतः लक्ष घालून ऑक्सिजन टॅंक उभारणीसाठी पाठपुरावा केला.
हिंगोली जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. आज घडीला 2 हजार 750 एवढी नोंद झाली असून, अडीच हजारांच्या वर रुग्ण बरे झाले आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात हिंगोली येथील रिकव्हरी रेट चांगला आहे आणि रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सुध्दा जास्त आहे.
ऑक्सिजनची कमतरता पडू नये, यासाठी खबरदारी म्हणून येथे 13 हजार लिटर ऑक्सिजन टॅंक उभारण्यात आला आहे. नियमित पाठपुरावा सुरू असल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या पाठपुराव्याला यश आले. आज टॅंकमध्ये ऑक्सिजन टाकण्यात आले आहे. कोरोना वार्डमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांना या ऑक्सिजन टॅंकमुळे संजीवनी मिळणार आहे. दिवसाकाठी येथे 1 हजार लिटर ऑक्सिजन लागतो.
या टॅंकमध्ये 13 हजार लिटर ऑक्सिजन बसत असून, 13 दिवस आता चिंता करण्याची गरज नाही. ऑक्सिजन संपण्याच्या दोन दिवस अगोदर मागणी केली जाणार असून ऑक्सिजनचा अखंडित पुरवठा करण्यासाठी मदत होणार आहे. दरम्यान उदघाटन प्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे, डॉ. मंगेश टेहरे, डॉ. डोंगरे, डॉ. नगरे, डॉ. मोरे, पूजा गिरी, एस. टी. नाईकवाडे आदींची उपस्थिती होती.