हिंगोली - जिल्ह्यात नवे 12 कोरोना रुग्ण शुक्रवारी आढळले आहेत. आतापर्यंत 289 रुग्णांची नोंद झाली आहे. तर तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या उपचारामुळे 8 कोरोनाबाधितांनी कोरोनावर विजय मिळविला असल्याने त्यांना शुक्रवारी सुट्टी देण्यात आली.
जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्ण संख्येत वाढत होतं चालली आहे. कोरोना शहरातून ग्रामीण भागातही पोहोचल्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे. शुक्रवारी प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये एकूण 12 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. नव्याने आढळलेल्या रुग्णांमध्ये हैदराबाद येथुन हिंगोली शहरातील गांधीचोक येथे आपल्या नातेवाईकांकडे आलेल्या मुलाचा आणि त्यांच्या आईला समावेश आहे. हे दोघेही 29 जुनला हिंगोलीला आले होते. त्यांना सर्दी, खोकला, ताप आल्याने सामान्य रुग्णलायात दाखल केले असता, त्यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.
कळमनुरी येथील कोरोना केअर सेंटर अंतर्गत 5 जणांचे अहवाल कोरोनाबाधित आले आहेत. यात दोघे जण हे औरंगाबाद येथून आले आहेत. तर इतर तिघे जण मुंबई येथून परतलेले आहेत. तसेच सेनगाव क्वारंटाईन सेंटरमधील एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. एकूण 12 रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे.