गोंदिया- जिल्ह्यातील आमगाव शहरातील जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या इमारतीला गळती लागली असून इमारत जीर्ण झाल्याने विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात आला आहे. दरम्यान इमारतीची दुसरी सोय नसल्याने इमारतीमध्ये जीव मुठीत घेऊन विद्यार्थी ज्ञानार्जन आणि शिक्षक अध्यापन करत आहेत. मात्र, कधीही मोठी दुर्घटना होण्याच्या शक्यतेने विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
आमगाव शहरातील जिल्हा परिषद हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय, आमगाव तालुक्यातील सर्वात जुने व मोठे महाविद्यालय आहे. आमगाव तालुक्यातून या महाविद्यालयात शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी येतात. मात्र या महाविद्यालयातील अनेक वर्ग खोल्या जीर्ण झाल्या आहेत. या जीर्ण झालेल्या इमारतीच्या छतांचे पोपडे पडायला लागले आहेत. मुख्याध्यापीका के. एम. पुसाम यांनी याची तक्रार वरिष्ठांना केली आहे. मात्र, प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. तसेच या महाविद्यालयात शिकवणारे शिक्षक आणि शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात असल्याचे दिसून येत आहे. अनेकदा या इमारतीच्या छतावरचे पोपडे वर्ग सुरू असताना विद्यार्थ्यांच्या डोक्यावर पडतात. छतावरचे काँक्रेट पडून लोखंडी सळ्या बाहेर निघाल्या आहेत. जेव्हापासून पावसाळा सुरू झाला तेव्हापासून वर्गखोलीत पाण्याची गळती होत आहे. त्यामुळे प्रशासन एखादी मोठी घटना घडण्याची वाट पाहत आहे, असा सवाल उपस्थित केला जात आहे.