गोंदिया - नगर परिषदेमार्फत शहरातील ४ हजार नागरिकांना मोफत नळजोडणी योजना राबवण्यात आली. या योजनेत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाला असल्याचा आरोप जिल्हा युवक काँग्रेस आणि एनएसयुआयने केला आहे. दोषींवर कारवाई करण्यात यावी आणि टेंडर रद्द करण्यात यावे, या मागण्यांसासाठी दोन्ही संघटनांनी आज नगरपरिषदेत धरणे आंदोलन केले. मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारादेखील त्यांनी यावेळी दिला आहे.
मोफत नळ जोडणी कंत्राट मुख्याधिकाऱ्यांच्या जवळच्या कर्मचाऱ्याच्या नातेवाईकाला देण्यात आला आहे. कंत्राट दिल्यापासून १० नोव्हेंबरपर्यंत एकही नळजोडणी करण्यात आली नव्हती. जिल्हा युवक काँग्रेसने विचारणा केल्यानंतर ५० जोडण्या करण्यात आल्या, असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. जिल्हा युवक काँग्रेस आणि एनएसयुआयने २१ नोव्हेंबरला जिल्हाधिकाऱ्यांना यासंबंधीचे निवेदन दिले होते. मात्र आठवडा उलटूनही कारवाई न झाल्याने हे आंदोलन केल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
हेही वाचा - गोंदियात ८० अल्पवयीन वाहनचालकांवर कारवाई; ४२ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल
या घोटाळ्यात नगर परिषदेतील अनेक पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. दरम्यान, आज चौकशी अधिकाऱ्यांनी पाणी पुरवठा विभागातील कनिष्ठ अभियंता शेंडे आणि कंत्राटदाराची चौकशी केली आहे. याप्रकरणी मोठा भ्रष्टाचार उघडकीस योण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.