गोंदिया - तिरोडा तालुक्यातील चिरेखनी येथील मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यात पावसाचे पाणी साचून गटारे तयार झाली आहेत. वारंवार तक्रार करूनही रस्त्याची दुरुस्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे, संतप्त गावकऱ्यांनी आज रास्ता रोको आंदोलन करून प्रशासन आणि लोकप्रतिनिधींविरोधात संताप व्यक्त केला.
चिरेखनी गावात जाण्यासाठी एकच मुख्य रस्ता आहे. सततच्या वर्दळीमुळे या रस्त्याची दुर्दशा झाली आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने या मार्गावरून ये-जा करणे गावकऱ्यांना त्रासदायक झाले आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने अनेकांचे अपघात होऊन दुखापतदेखील झाली आहे. रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी, या मागणीसाठी गावकऱ्यांनी अनेकदा आमदार विजय रहांगडाले आणि जिल्हा परिषद सदस्या राजलक्ष्मी तुरकर यांच्याशी संपर्क साधला. मात्र त्यांनी याची दखल घेतली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
आमदार परिणय फुकेंनी लोकार्पण केलेले तहसील कार्याल १० दिवसानंतरही बंदच!
संतापलेल्या गावकऱ्यांनी रस्त्याचा व्हिडिओ तयार करून सोशल माध्यमावर टाकला. पण त्यानंतरही प्रशासनाला जाग न आल्याने चिरेखनी येथील गावकऱ्यांनी अखेर रास्ता रोको आंदोलन करुन प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. जोपर्यंत हा रस्ता दुरुस्त केला जाणार नाही, तोपर्यंत रस्ता रह्दारिसाठी सुरू होऊ देणार नाही, अशी भुमिका गावकऱ्यांनी घेतली आहे.