गोंदिया - कोरोनामुळे देशात लॉकडाऊन असताना पंतप्रधान मंत्री कल्याण योजने अंतर्गत प्रती व्यक्ती पाच किलो मोफत धान्य दिले जात आहे. मात्र, गोंदिया जिल्ह्यातील पानगांव येथील रेशन दुकानदारांनी रेशन घेणाऱ्या नागरिकांच्या रेशनवर डल्ला मारला आहे. ज्या लोकांचे ऑनलाईन यादीमध्ये आठ युनिट असतानासुद्धा त्यांना ६ युनिटने रेशन दिले जात आहे. यासंबंधी विचारणा केली असताना दुकानदार गावकऱ्यांनाच धमकी देत असून आता याची तक्रार तहसीलदार यांना करण्यात आली आहे.
आमगाव तालुक्यातील पानगांव येथील रेशन दुकानदार आपला मनमर्जी कारभार मागील अनेक वर्षांपासून करत आहे. कोरोनामुळे सध्या लॉकडाऊन सुरू असताना पंतप्रधान यांनी गरीब लोकांना प्रतिव्यक्ती 5 किलो धान्य दिले जाणार असल्याची घोषणा केली होती. त्यांनतर ग्रामीण भागात प्रत्येक रेशन दुकानात धान्य वाटप करण्यात आले. मात्र, पानगांव येथील नागरिक आपल्या हक्काचा रेशन घेण्यासाठी गेले असताना अनेक लोकांना रेशन दुकानदारांनी कमी रेशन दिले असल्याचे निदर्शनात आल्यावर नागरिकांनी दुकानदाराला ऑनलाईन पावती मागितली. यानंतर दुकानदाराचे बिंग फुटले.
ऑनलाईनमध्ये ८ लोक दाखविताना ६ लोकांनाच धान्य देत होता. अशा गावातील शंभरहून अधिकांचा समावेश असून त्यामुळे सरपंचांनी दुकानदाराला विचारले असता दुकानदाराने मी माहिती देत नाही तुम्हाला जे करायचे आहे ते करा, असे बोलल्यानंतर गावकऱ्यांनी त्याची तक्रार तहसीलदारांकडे केली. तर या संपूर्ण प्रकरणाची तक्रार झाल्यावर त्याची चौकशी झाली आहे. त्यामध्ये रेशन दुकानदारांची अनियमितता आढळली असून त्याच्यावर कारवाई व्हावी याकरिता तहसीलदारांनी याचा अहवाल जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे पाठविला आहे. त्यामुळे रेशन दुकानदारांवर नक्कीच कारवाई होणार असल्याचे तहसीलदारांनी सांगितले.