गोंदिया- अर्जुनी मोरगाव आणि आमगाव तालुक्यातील दोन व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे. 2 कोरोनाबाधित रुग्ण आढळ्याने 38 दिवसांपासून ग्रीन झोनमध्ये असलेला गोंदिया जिल्हा 39 व्या दिवशी परत आँरेंज झोनमध्ये आलेला आहे. गोंदियात पहिला रुग्ण २६ मार्च ला पॉझिटिव्ह निघाला १० एप्रिलला तो युवक कोरोनामुक्त झाल्यानंतर जिल्हा ग्रीन झोनमध्ये आलेला होता. दोन्ही कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तींना क्वारंटाइन करण्यात आले आहे.
अर्जुनी मोरगाव तालुक्यातील व्यक्ती हा मुंबईतील दहिसर येथून ट्रकने गडचिरोली जिल्ह्यातील मजूरांसोबत आला होता. गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा येथील जो मजूर कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला होता. त्यांच्यासोबत तो ट्रकमध्ये आल्याने त्याला कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती आहे. मुंबईवरुन आलेल्या सर्व ५२ मजुरांना प्रशासनाने क्वारंटाइन केले आहे.
जिल्हा प्रशासन गोंदिया जिल्हा ग्रीन झोनमध्ये ठेवण्यासाठी अथक परिश्रम घेत असनाना पुन्हा 2 कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे. दोन्ही रुग्णांची गावे ही कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आली आहेत.