गोंदिया - देशात प्रसिद्ध असलेल्या नवेगाव - नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील कोका वन्यजीव अभयारण्यामध्ये अवैधरित्या मुरूम उत्खनन आणि वृक्षांची कापणी करण्यात आल्याची माहिती समोर आली. त्यामुळे वन्यप्राण्यांना धोका निर्माण झाला आहे. या घटनेची तात्काळ चौकशी करून आरोपिंविरूद्ध कारवाई करण्यात यावी, अशी तक्रार पीपल्स फॉर अॅनिमल यांनी वन्यजीव विभाग नागपूर आणि पिपल्स फॉर अॅनिमलचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार मेनका गांधी यांना केली आहे.
या विषयी पीपल्स फॉर अॅनिमल्स चे सेक्रेटरी सचिन रंगारी यांनी तक्रारीत म्हटले आहे, की नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पच्या कोका वन्यजीव अभयारण्यात कक्ष क्र. १६०, १६५, १६८, १६९, १७२, १७३, १७५, १७६, १७७, १७९, १८०, ३८४ तसेच ३८५ मध्ये अवैधरित्या कुऱ्हाड आणि उपकरणांचे सहाय्याने वृक्षांची कापणी, तसेच जेसीबीच्या माध्यमातून मुरूमाचे उत्खनन करण्यात आले. त्यानंतर त्याची शासकीय वाहनाने जंगलाबाहेर वहन करण्यात आले. त्यात ऐन, सिहना, गराडी, धावणा, मोह, अटई, चारोळी, किन्ही या प्रजातींचा समावेश आहे. या झाडांची वय सुमारे १० ते २० वर्षे होती. अवैध उत्खनन सोबत वृक्षांची कापणी केल्यामुळे वन्य जीव व पक्ष्यांना धोका निर्माण झाला आहे. तृणभक्षी अन्नाचे स्त्रोत वनस्पतीद्वारे नष्ट झाले आहे. यासाठी या घटनेची तत्काळ चौकशी करून आरोपींविरूध्द कार्यवाही करण्यात यावी, अशा प्रकारची तक्रार महाराष्ट्र राज्य वन्यजीव विभाग नागपूर आणि पिपल्स फॉर अॅनिमलचे संस्थापक खासदार मेनका गांधी यांना केली आहे. या बदल वनसंरक्षक, क्षेत्र संचालक, नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प गोंदियाचे आर. एम. रामानुजम यांना या प्रकरणा बदल विचारले असता त्यांनी सांगितले, की या प्रकरणाची तक्रार सध्या माझ्या पर्यंत आलेली नाही. तक्रार आली तर चौकशी करू असे सांगितले.