गोंदिया - वनपरिक्षेत्रात येणाऱ्या चुटिया आणि लोधीटोला गावाच्या शेतशिवारात वीजेच्या तारामध्ये अडकून तीन वर्षाच्या वाघाचा मृत्यू झाला आहे. ही घटना उघडकीस येऊ नये म्हणून आरोपीने धारदार शस्त्राने वाघाच्या शरीराचे तुकडे शेतशिवारात फेकून दिले आहे. वन अधिकारी वाघाच्या डोके आणि पंजाचा शिवारात शोध घेत आहेत.
गोंदिया तालुक्यात येणाऱ्या चुटिया आणि लोधीटोला या गावाला लागून असलेल्या नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सीमा आहे. या भागात नेहमीच वन्यजीवांचा वावर असतो. मात्र, हव्या त्या प्रमाणात वनविभागाकडून जंगलात गस्त होत नाही. या भागात जंगली डुक्कर आणि चितळांच्या शिकारी मोठ्या प्रमाणात विजेचा शॉक देऊन होत असतात. अशाच जंगली डुकरांच्या शिकारीकरिता वीज प्रवाह असलेल्या तारा सोडण्यायात आल्या होत्या. या वीजेचा शॉक लागून तीन वर्षाच्या वाघाचा मृत्यू झााल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आरोपीने ही घटना उघडकीस येऊ नये, म्हणून धारदार शास्त्राने वाघाचे तुकडे केले. वाघाचे तुकडे परिसरातील शेत शिवारात फेकून दिले होते. धान कापणीसाठी शेतात गेल्या शेतकऱ्यांना शिवारात दुर्गंधी आली. त्यांनी जवळ जाऊन पहिले असता वाघाचे कातडे दिसून आले. त्यांनी वाघाचे कातडे आढळल्याची माहिती वन विभागाला कळविली.
वनाधिकाऱ्यांकडून आरोपीचा शोध सुरू-
वनाधिकऱ्यांनी श्वान पथकाच्या माध्यमातून वाघाचे काही अवयव शोधून काढले. मात्र, अजूनही वाघाचे डोके आणि दोन पंजे मिळू शकले नाहीत. वनाधिकारी आरोपीचा शोध घेत असल्याचे नागझिरा व्याघ्र प्रकल्पाचे सहायक वनपरिक्षेत्र अधिकारी राजेंद्र सद्गिर यांनी सांगितले.
वन्यजीवांचे अस्तित्व धोक्यात-
दरम्यान, यापूर्वीदेखील याच भागात अनेकदा वन्यजीवांच्या शिकारी झाल्याचे प्रकार समोर आले होते. त्यावर वन विभागाकडून कोणतेही ठोस पाऊल उचलण्यात आले नाही. आरोपीकडून वन्यजीवांच्या हत्येचे सत्र सुरुच आहे. त्यामुळे बोटावर मोजण्याइतके वाघ असलेल्या नागझिरा व्याघ्र प्रकल्पात वाघाचे अस्तित्व धोक्यात आले आहे.