गोंदिया- जिल्ह्यात आज एक कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला आहे. हा रुग्ण मुंबई येथे शिक्षक म्हणून कार्यरत आहे. तो गोंदिया येथे आला होता. आतापर्यंत जिल्ह्यात 106 बाधित रुग्ण आढळून आले आहेत. गोंदिया येथील विषाणू चाचणी प्रयोगशाळेकडे 394 अहवाल प्रलंबित आहे.
गोंदिया तालुक्यातील मुंडीपार एमआयडीसी येथील एक व्यक्ती नागपूर येथे कोरोनाबाधित आढळली होती. त्या व्यक्तीचा नागपूर येथे शनिवारी मृत्यू झाला. त्या रुग्णावर गोंदियातील 3 डाॅक्टरांनी उपचार केले होते. त्या डाॅक्टरांना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे. त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी दिली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 102 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहे. जिल्ह्यात आता 3 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
गोंदियाच्या प्रयोगशाळेत आतापर्यंत कोरोना संशयित 2560 व्यक्तींच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. त्यामध्ये 106 रुग्ण हे कोरोनाबाधित आढळून आले. शनिवारी नागपूर येथे मृत्यू झालेल्या व्यक्तीचा समावेश जिल्ह्यातील 106 बधितांमध्ये करण्यात आला आहे. जिल्ह्यातील विविध शाळा व संस्थांमध्ये 560 आणि घरी 1901 अशा एकूण 2461 व्यक्ती विलगीकरणात आहे.
जिल्ह्यात आढळलेले 106 कोरोना बाधित रुग्ण अर्जुनी/मोरगाव तालुका – 31,सडक/अर्जुनी तालुका – 10, गोरेगाव तालुका – 4, आमगाव तालुका -1, सालेकसा तालुका – 2, गोंदिया तालुका – 23 आणि तिरोडा तालुक्यातील 34 रुग्ण याप्रमाणे आहेत.
जिल्ह्यातील कंटेंनमेंट दहा झोन बंद करण्यात आले आहे. सालेकसा तालुक्यातील 10 कंटेंनमेंट झोनपैकी बामणी येथील कंटेंनमेंट झोन वगळता उर्वरित 9 कंटेंटमेंट झोनमधील नागरिकांना उपलब्ध सेवामध्ये शिथीलता देण्याची कार्यवाही करण्यात आली आहे. जिल्ह्यात आता क्रियाशील कंटेंनमेंट झोन दहा असून यामध्ये गोंदिया तालुका–नवरगाव/कला, कटंगी, परतवाडा, चुटिया, रजेगाव, गजानन कॉलनी व काटी. सालेकसा तालूका -धनसुवा व बामणी.तिरोडा तालुका-तिरोडा आदी.दहा झोनचा समावेश आहे.