गोंदिया - शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर स्वॅब नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळा तयार करण्यात आली. यासाठी सिंगापूरहून मशिन देखील मागवण्यात आले. संबंधित यंत्र सामुग्रीचे तज्ज्ञांकडून शुक्रवारी इन्स्ट्रालेशन झाले. यानंतर २ जून पासून स्वॅब नमुने तपासणीची प्रक्रिया सुरू होणार होती. मात्र या मशिनची काच फुटल्याने आता स्वॅब नमुने तपासणीची प्रक्रिया पुन्हा एक आठवडाचा लांबणीवर पडलीय.
शहरातील शासकीय महाविद्यालयात स्वॅब नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळा आणि आवश्यक यंत्रसामुग्री नव्हती. त्यामुळे गोंदियातील स्वॅबचे नमुने नागपुरातील मेयो आणि मेडिकलच्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठण्यात येत होते. विदर्भातील वाढत्या प्रादुर्भावाच्या काळात सर्व जिल्ह्यातील नमुने नागपुरातच येत असल्याने त्यावर प्रक्रिया होण्यास वेळ लागत होता. परिणामी अहवाल देखील उशीराने प्राप्त होत होते.
परिणामी रुग्णांवर त्वरीत उपचार सुरू करण्यास अडचण होत होती. यासाठी शासनाने स्वॅब नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळा सुरू करण्यास मंजुरी दिली. सिंगापूरहून यंत्र सामग्री मागवण्यात आली. दहा दिवसांपूर्वी गोंदियात मशीन दाखल झाली. येथे दाखल झाली यानंतर शुक्रवारी दि. २९ रोजी या मशिनचे इन्ट्रॉलेशन करण्यासाठी ही मशिन उघडण्यात आली. मात्र ज्या मशिनवर स्वॅब नुमने तपासणी केले जातात, त्याच्या काचा फुटल्याने हे काम पूर्णपणे बंद करण्यात आले आहे.
आता हैद्राबादवरून या मशिनसाठी काच मागवण्यात आली आहे. त्यासाठी आणखी एक आठवड्याचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. यामुळे आता आठवडाभरानंतरच पुन्हा टेस्टींग सुरू होणार आहे.