गोंदिया - जिल्ह्यात वाळू तस्करांची मुजोरी वाढताना दिसत आहे. अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर कारवाईसाठी गेलेल्या तलाठी व तहसीलदारांच्या वाहनावर दगडफेक झाल्याची घटना गुरुवार (दि. 11 जून) तेढवा येथील घाटावर घडली आहे.
जिल्ह्यात वाळूचा लिलाव झाला नाही. त्यामुळे अनेक दिवसांपासून तालुक्यातील तेढवा, काटी व राजेगाव या परिसरातून अवैध वाळू उपसा होत आहे. यामुळे गोंदियाचे नायब तहसीलदार यांच्या नेतृत्वाखाली तलाठी हटवार, बुचे, भोयर यांच्या पथकाकडून धाडसत्र सुरू करण्यात आले आहे. पथकाने बुधवारी (दि. 10 जून) रात्रीपासून गस्त घालण्यास सुरुवात केली.
आज (दि. 11 जून) सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास काटी परिसरातून 3 ट्रॅक्टर पकडण्यात आले. याची चौकशी केली असता, तेढवा घाटातून वाळू उपसा होत असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यावरून पथक तेढवा येथील घाटावर पोहोचले. त्यावेळी तेथे उपस्थित सर्वांनी घटनास्थळावरून पळ काढला. त्यानंतर तेथील साहित्य जप्त करुन तलाठी हे वाहनात ठेवत असताना त्यांच्या वाहनावर दगडफेक करण्यात आली. तर काहींनी तलाठींसोबत असलेल्या पथकावर हल्ला चढवला. घटनेचे गांभीर्य पाहता तलाठ्यांनी थेट काटीकडे धाव घेतली. याबाबत रावणवाडी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे.
हेही वाचा - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण शहरात जंतुनाशक फवारणी