गोंदिया - शहरातील दीपेश सोनेवाने या तरुणाच्या कलेची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने दखल घेतली आहे. या तरुणाने पेन्सिल लीड मायक्रो आर्टच्या माध्यमातून एकाच पेन्सिलवर जगातील सात आश्चर्य असलेल्या वास्तूंची कलाकृती काढली आहे. तसेच जगातील सर्वात उंच स्टॅच्यू ऑफ युनिटी हा सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा अवघ्या ८ से. मी. मध्ये पेन्सिलच्या लीड आर्टच्या माध्यमातून तयार केला आहे. पाहुयात दीपेशच्या कलेची सफर घडवणारा हा रिपोर्ट.
भारतात काही विशेष कार्य करणाऱ्या लोकांची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद घेतली जाते. त्यांना अवॉर्ड देऊन त्यांचा सन्मान करण्यात येतो. दीपेश सोनेवाने या तरुणाने पेन्सिल लीड मायक्रो आर्टमध्ये केलेल्या कामाची दखल इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने घेतली आहे. दीपेशने जगातील सात आश्चर्य असेलल्या वास्तूंना फक्त एका पेन्सिलच्या लीडवर कोरीव काम करून सुंदर अशी कलाकृती तयार केली आहे. त्यामध्ये ताजमहाल, पेट्रासिटी, ग्रेट वॉल ऑफ चायना, रिवोदि जानेरो, चीचन इटजा, कोलोझीअम, मच्चू पिच्चू यांचा समावेश आहे. तर सोबतच जगातील सर्वात उंच सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळादेखील त्याने सर्वात लहान आकार देत पेन्सिल लीड आर्टच्या माध्यमातून तयार केला आहे.
आईच्या वाढदिवशी कुटुंबीयांना दिली माहिती -
दीपेश सातव्या वर्गात असताना त्याला हा छंद लागला. सुरुवातीला तो वेडेपणा करतो, असे कुटुंबीयांना वाटले. मात्र, त्याने त्याचा छंद जोपासत पेन्सिल लीड आर्टमध्ये विविध धर्माचे सिम्बॉल, थोर महापुरुषाचे चित्र, भारताचा ध्व्ज तसेच देवींच्या प्रतिमा त्याने तयार केल्या आहेत. त्याचप्रमाणे त्याने त्याच्या अनेक कलाकृती विकल्या आहेत. दीपेशच्या कलेची दखल इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने घेतल्याने त्याच्या कुटुंबीयांनाही आनंद झाला आहे. दीपेशला २० दिवसांपूर्वी त्याचा अवॉर्ड पोस्टाने प्राप्त झाला. मात्र, ३ नोव्हेंबरला दीपेशने आईच्या वाढदिवसाच्या दिवशी ही माहिती कुटुंबीयांना दिली.
देशसेवा करण्याची दीपेशची इच्छा -
दीपेशला दोन बहिणी असून मोठी बहीण स्नेहल ही अभियंता आणि एक उत्कृष्ठ पेंटर आहे. तर दुसरी बहीण श्रुती केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करत असून तीदेखील टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू तयार करते. दरम्यान, दीपेशला पेन्सिल आर्टमध्ये करीअर करायचे नाही. त्याला पर्वतारोहणाची आवड असून भारतीय सेनेत सेवा द्यायची आहे, असे त्याने ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले.