गोंदिया: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट 'ब' मुख्य परीक्षा २०२० अंतर्गत पोलीस उपनिरीक्षक पदाची नुकतीच यादी जाहीर करण्यात आली. त्यात अर्जुनी मोरगाव येथील खुशबू प्रल्हाद बरैय्या या २५ वर्षीय युवतीने ३६४ गुण मिळवून पोलीस उपनिरीक्षक पदावर आपले स्थान निश्चित केले. खुबशूच्या या असामान्य यशाबद्दल तिचे कौतुक केले जात आहे.
चप्पल शिवणाऱ्याने जाणले शिक्षणाचे महत्त्व: खुशबूचे वडील प्रल्हाद बरैय्या हे अर्जुनी-मोरगाव या शहरात लहानसे दुकान थाटून चप्पल, जोडे शिवण्याचे काम करतात. दोन खोल्यांच्या घरात राहणाऱ्या ह्या कुटुंबात पत्नी, एक मुलगा, दोन मुली यांच्यासह राहतात. आपल्या कुटुंबाचा गाडा चालविणारे प्रल्हाद त्यांनी बारावीपर्यंत शिक्षण घेतले. पत्नी आजारी असूनही मुलांच्या शिक्षणात खंड पडू दिला नाही. शिक्षणापासून प्रगती नाही याची जाण त्यांना वेळोवेळी होत असल्याने त्यांनी तिन्ही मुलांना उच्च शिक्षणाची गोडी लावली. आपली मुले शिक्षण घेऊन शासकीय पदावर कार्यरत राहावे, अशी त्यांची अपेक्षा होती.
शहराच्या लायब्ररीत बसून केला अभ्यास: घरामध्ये अभ्यासासाठी सोय नसतानासुद्धा खुशबूने स्वत: कष्ट करून, त्रास भोगून ,स्पर्धा परीक्षेचे कोणतेही वर्ग न लावता एमपीएससीचा अभ्यास केला. यासाठी शहरात असलेल्या लायब्ररीत जाऊन ती तास न तास अभ्यास करायची. अभ्यासात खंड पडू नये म्हणून दोन तास जास्त अभ्यास करत असायची. मात्र, अभ्यासवर्गाचा आग्रह कधी केला नाही.
एकच ध्यास, सरकारी नोकरीसाठीच अभ्यास: सरकारी नोकरी करायची हा एकच ध्यास मनामध्ये अंगीकारून खुशबूने नियमित अभ्यास, अवांतर वाचनाने यश संपादन केले. अर्जुनी मोरगाव पोलीस ठाण्याच्या वाचनालयात खुशबूने आपले यशस्वी भविष्य घडविले. नित्यनेम सकाळी आठ वाजता खुशबू वाचनालयात जायची. भाऊ तिला जेवणाचा डबा नेऊन द्यायचा. एकदा सकाळी वाचनालयात गेल्यावर संध्याकाळी यायची. घरी आल्यावरसुद्धा काही वेळ अभ्यास करायची. असा संघर्ष करत तिने एमपीएससी परीक्षेमध्ये यश मिळवले आहे. खुशबूचा संघर्ष हा इतर युवतींसाठी प्रेरणादायी आहे.