गोंदिया :- राज्यात कोरोना लसीकरणासाठी लांबच लांब रांगा लागल्या आहेत. मात्र लसींचा तुटवडा जाणवत असल्याने लस मिळत नाही. दुसरीकडे गोंदियात वेगळेच चित्र आहे. गोंदियात नागरिक वेळेवर लसीकरणासाठी न पोहचल्याने तब्बल 6,057 लसी वाया गेल्यात. त्यात आता गोंदियातील जेष्ठ नागरिकांकडून नवीनच मागणी समोर आली आहे. ज्याप्रमाणे नेते मतदानासाठी जेष्ठांना वाहन घेवून घरपोच घ्यायला येतात आणि मतदान केंद्रावर घेवून जातात, त्याच प्रमाणे लसीकरणासाठी त्यांनी वाहन घेवून घरी यावे आणि लसीकरण केंद्रावर घेवून जावे, अशी मागणी करत आहेत.
कोरोनामुळे जिल्ह्यात एक हजारांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. मात्र, तरीही नागरिक लस घेण्यासाठी तयार नाहीत. ग्रामीण भागात तर परिस्थिती जास्तच बिकट आहे. लसीकरणाबाबत जनजागृती नसल्याने मरून जाईल, पण लस घेणार नाही, अशी नागरिकांची भूमिका आहे. या भागात जनजागृती करण्यात लोकप्रतिनिधी कमी पडत आहेत. देशात सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं भीषण रुपय धारण केलं आहे. कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असून लोक मरत आहेत. ऑक्सिजन, रेमडेसिवीर आणि इतर औषधं मिळत नसल्यानं अनेकांना जीवाला मुकावे लागत आहे, त्यामुळे लसीकरण हाच एकमेव पर्याय असल्याचं तज्ज्ञांनी सांगितलंय. लसीकरणानंतर कोरोना होऊ शकतो, मात्र, त्याची लक्षणे आणि परिणाम फारस सौम्य राहतील असेही तज्ज्ञांचे म्हणणे आहे. गोंदिया जिल्ह्यातील बहुतांश भाग हा ग्रामीण असल्याने इथे लसीकरणाबाबत लोकांमध्ये जनजागृती नाही, तसेच लसीबाबत ग्रामीण भागात बऱ्याच अफवा आहेत, त्यामुळे लोक लस घेण्यासाठी पुढे येत नाही.
काही ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांनी हट्ट धरलाय की लोकप्रतिनीधींनी वाहन घेऊन यावे, आणि लसीकरणासाठी घेऊन जावे. मात्र, त्यांच्या या मागणीला कोणताच प्रतिसाद नाही. त्यामुळे बरेच जण या मागणीपायी जीव धोक्यात घालत आहेत. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी जसे मत मागण्यासाठी दारोदारी जातात, तसेच त्यांनी दारोदारी जावे आणि लोकांना लसीचे महत्व पटवून सांगावे, तरच लोकांमध्ये जनजागृती होईल.
दरम्यान, नागरिकांचा लसीकरणाबाबतचा पवित्रा बघून प्रशासनही गोंधळले आहे. लोकांना लस घेण्यास कसे तयार करावे, हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे. कोरोनाचा प्रसार दिवसेंदिवस वाढत असून गावखेड्यातही शिरकाव झाला आहे. ग्रामीण भागात आधीच आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडालाय, त्यात कोरोना झाल्यास कोणतीच सोय होण्याची शक्यता कमी असते. तसेच काही भागात कोरोनाबाबतच जनजागृती आणि पुरेशी माहिती नाही, त्यामुळे लोक रुग्णालयात दाखल होण्यास तयार होत नाही, त्यामुळे संसर्गाचा धोका वाढला असून आरोग्य यंत्रणा हतबल झाली आहे. या सर्व अडचणींवर उपाय म्हणून जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी समोर येऊन जनजागृती करणे गरजेचे झाले आहे. तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या मागणीकडेही नेते मंडळींनी गांभिर्याने बघावे, अन्यथा परिस्थिती आणखी गंभीर होईल असेही बोलले जात आहे.
हेही वाचा- लसींचा तुटवडा नाही, राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांकडे 2 कोटी लसीच्या मात्रा उपलब्ध