गोंदिया - जिल्ह्यात यावर्षी १३ जून ते १८ जून दरम्यान सारस पक्ष्याची गणना करण्यात आली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी गोंदिया-भंडारा जिल्ह्यात तसेच नजीकच्या बालाघाट जिल्ह्यात सारस पक्ष्याच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात फक्त गोंदियात सारस पक्षी आढळतो. त्यामुळे सारसच्या संवर्धनासाठी त्यांच्या संख्येची माहिती असणे गरजेचे आहे.
सारस पक्ष्याचा अधिवास जिल्ह्यात निवडक ठिकाणी असल्यामुळे अनेक स्वयंसेवी संस्था, शेतकरी व सारस प्रेमी त्यांच्या संवर्धनाचे काम करीत आहेत. १३ जूनला गोंदिया जिल्ह्यातील सेवा संस्थेच्या माध्यमातून २४ टीम तयार करण्यात आल्या. या टीमने गोंदिया, भंडारा तसेच नजीकच्या मध्यप्रदेश राज्यातील बालाघाट जिल्ह्यात सारस गणनेला सुरुवात केली. ही गणना १८ जूनला पूर्ण झाली आहे. जिल्ह्यात ४५ ते ४७ सारस पक्ष्यांची नोंद करण्यात आली. तर नजीकच्या बालाघाट जिल्ह्यात ५६ ते ५८ सारसांची नोंद झाली. तसेच भंडारा जिल्ह्यातही २ सारस पक्षी आढळले आहेत.
सारस गणना पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या संवर्धनाची जवाबदारी संस्थेचे पदाधिकरी घेतात. सारस पक्षी हे धानाच्या शेतात आपले घरटे तयार करून अंडी घालून पिलांना जन्म देतात. त्यामुळे नवीन सारस जन्माला येणार असला की त्याच्या संवर्धनासाठी ही संस्था वर्षभर जनजागृती करीत असते. सारस हा पक्षी जगातील सर्वात मोठ्या उडणाऱ्या पक्षात मोडतो. शिवाय एका सारसाचा मृत्यू झाल्यास दुसरा सारस देखील मृत्यूला कवटाळतो, त्यामुळे त्याच्या संवर्धनासह संरक्षण देखील होणे गरजेचे आहे.
जिल्ह्यात अलिकडे सारस संवर्धनासाठी अनेक युवक मंडळी समोर येत आहे. सुरुवातीच्या काळात अगदी बोटावर मोजण्याइतकी असलेली सारस पक्ष्यांची संख्या गेल्या काही वर्षांपासून वाढत आहे. विविध गैर सरकारी संस्था तसेच पक्षीप्रेमींनी सारस संवर्धनासाठी केलेले काम मोलाचे आहे.