गोंदिया - प्राथमिक आरोग्य केंद्रात सिक्युरिटी गार्ड आणि सुपरवायझर पदासाठी नोकरी लावण्याच्या नावावर सेवानिवृत्त पोलिसाने लाखोंची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. पुरुषोत्तम सोनेकर, असे या सेवानिवृत्त पोलिसाचे नाव आहे.
स्ट्राँग सिक्युरिटी गार्ड कंपनी, बुट्टीबोरी, नागपूर येथून गोंदिया जिल्ह्यात असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये सिक्युरिटी गार्ड पुरविण्यात येणार आहे. त्यामुळे सिक्युरिटी गार्ड व सुपरवायझर या पदासाठी नोकरी लावून देण्याच्या नावावर निवृत्त पोलीस सोनेकर यांनी बेरोजगार युवकांना विश्वासात घेऊन प्रति व्यक्ती ३५ ते ५० हजार रुपयांची मागणी केली.
त्यानुसार सोनेकर यांनी बेरोजगार युवकांना कार्यालयाच्या पत्यावर जाऊन हे पैसे भरण्यास सांगितले. त्यानंतर त्या पैशांची पावती आपल्याकडे आणून जमा करण्यास सांगितले. त्या अनुषंगाने युवकांनी पैसे भरून पावती सोनेकर यांच्या स्वाधीन केले. यात सुमारे १५० ते २०० युवकांनी पैसे भरले. तसेच या युवकांना बोगस नियुक्ती पत्रसुद्धा देण्यात आले. त्यानंतर ते कर्तव्याच्या ठिकाणी रुजू होण्यासाठी गेले असता ते बनावट असल्याचे समोर आले.
ही बाब युवकांनी सोनेकर यांच्या लक्षात आणून दिली असता त्यांनी बनवाबनवीची उत्तरे दिली. तसेच युवकांनी याबाबत बुट्टीबोरी येथील कंपनीचे संचालक डी. टी. लोहाबे यांना विचारणा केली असता त्यांनी आपल्या कंपनीकडून कुठलेही पैसे किंवा नियुक्तीपत्र देण्यात आले नसल्याचे सांगितले. यावरुन आपली फसवणूक झाल्याचे युवकांना लक्षात आले.
एवढेच नव्हे तर बोगस नियुक्तीपत्र देऊनही सोनेकर यांनी त्या युवकांना शासनाकडून मंजुरी येणार असल्याचे सांगत आहेत. तसेच तुम्ही तक्रार करा किंवा काहीही करा, माझे काही होणार नाही, अशी दमदाटीही देण्यास सोनेकर मागे पुढे पाहत नाहीत.
एकंदरीत संपूर्ण प्रकरणाची चौकशी केल्यावर गोंदिया जिल्ह्यात एजन्सीमार्फत सुरू असलेल्या सिक्युरिटी गार्डच्या नावावर नियुक्तीचा गोरखधंदा समोर येण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. तसेच हे प्रकरण तिरोडा पोलिसांनी तपासात घेतल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.