गोंदिया - जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असल्याने नदी नाले भरून वाहत आहे. मोठ्या सिंचन प्रकल्पांच्या पाणीसाठ्यात वाढ झाल्याने पुजारीटोला, कालीसरार, संजय सरोवर धरणाचे 10 दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे वैनगंगा आणि बाघ नदीला पूर येऊन नदी काठच्या २० गावांना फटका बसला आहे.
गंगाझरी, गोरेगाव, परसवाडा, देवरी, कट्टीपार, कावराबांध, डव्वा या सात मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली असून जिल्ह्यात सरासरी 76.49 मिमी पावसाची नोंद झाली आहे. कोरणी येथे नदीकाठावरील मंदीर परिसरात फसलेल्या 8 जणांना व पुरग्रस्त गावातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे काम आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या चमूने सुरू केले आहे. गोंदिया तालुक्यातील काटी, बिरसोला, कासा, कोरनी, बनाथर, चंगेरा, जगनटोला, जिरूटोला, बडगाव, कटंगटोला, तेढवा, मरारटोला, किन्नी, डांगोरली, देवरी या गावांमध्ये वैनगंगा आणि बाघ नदीचे पाणी घुसल्याने पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. आज पहाटेपासूनच वैनगंगा आणि बाघ नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने गावांमध्ये पाणी शिरण्यास सुरूवात झाली होती.
पाणी पातळीत वाढ होत असल्याने जिल्हा प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या चमूला मदतीसाठी पाचारण केले आहे. गोंदिया तालुक्यातील कोरणी येथील पुरात अडकलेल्या आठ नागरिकांना व तिरोडा तालुक्यातील ढिवरटोला येथील १०६ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे काम युध्द पातळीवर हाती घेण्यात आले. कोरणी, डांगोर्ली, जिरूटोला, भद्याटोला या गावांमध्ये पुराचे पाणी साचल्याने अनेक घरे पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
संततधार पावसामुळे जिल्ह्यातील पांजरा-भोसा, कामठा-नवरगावकला, चांदोरी खुर्द-बघोली, आमगाव-किडंगीपार, आमगाव-कामठा, फुलचूर-तुमखेडा, कटंगी-टेमणी हे मार्ग अद्यापही बंद आहेत. हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे. येत्या चोवीस तासात जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
इटियाडोह संपूर्ण भरण्याच्या मार्गावर -
तीन दिवस झालेल्या पावसामुळे सिंचन प्रकल्पातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. अजुर्नी मोरगाव तालुक्यातील नवेगाबांध जलाशय ओव्हर फ्लो झाला आहे. तर, इटियाडोह धरण ओव्हर फ्लो होण्याच्या मार्गावर आहे. आज तिरोडा तालुक्यातील चोरखमारा जलाशय ओव्हर फ्लो झाला. जिल्ह्यातील सर्वच प्रमुख सिंचन प्रकल्पातील पाणीसाठा ८० टक्क्यांच्यावर आहे.