गोंदिया - वन्यजीवांमुळे शेतमालाचे होणारे नुकसान, त्यावरील उपयायोजना, आधारभूत भातपीक खरेदी केंद्रांची संख्या तातडीने वाढवणे यासह भातपीक उत्पादक शेतकऱ्यांच्या विवध समस्या सोडवण्याची मागणी माजी सामाजिक न्याय व विशेष सहायमंत्री राजकुमार बडोले यांनी केली. यासंबंधीतचे निवेदन गोंदियाचे प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आले.
महाराष्ट्र राज्य, मार्केटींग फेडरेशन व आदिवासी विकास महामंडळामार्फत भातपीक खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहेत. मात्र, या केंद्रावर शेतकऱ्यांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे भातपीक खरेदी केंद्रांची संख्या वाढविण्यात यावी, अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे भातपीक लाल रंगाचे झाल्याने त्याचे योग्य ग्रेडेशन करून खरेदी केंद्रांवर घेण्यात यावे, भातपिकांचा पैसे त्वरीत देण्यात यावे, गेल्या वर्षी शेतकऱ्यांनी केंद्रांना दिलेला बारदाना परत करण्यात यावा, मोजमापात शेतकऱ्याची लूट थांबविण्यासाठी केंद्रांना आकस्मित भेट देण्यात यावी, बाजार समित्यांमार्फत टोकन व भौतिक सुविधा उपलब्ध करण्यात याव्यात, भातपीक खरेदीचे नियम, दर तालुका व जिल्हा पातळीवरील दूरध्वनी क्रमांक व अन्य माहितीचे फलक केंद्रावर लावण्यात यावे, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.
हे वाचलं का? - शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी सांगलीत राज्यस्तरीय शेतकरी मेळाव्याचे आयोजन
जिल्ह्यातील बहुतांश शेतशिवार हा नवेगावबांध व नागझिरा अभयारण्य परिसराला लागून आहे. त्यामुळे वन्यप्राणी पाणी व खाद्यान्नाच्या शोधात शेतशिवारात जाऊन पिकांचे मोठे नुकसान करतात. यासाठी जंगल परिसरातील शेतीला कुंपनासाठी ९० टक्के थेट अनुदान शेतकऱ्यांना देण्यात यावे. सोबतच नुकसानीचे तातडीने पंचनामे करून भरपाई रक्कम देण्यात यावी, अशी मागणी बडोले यांनी केली. तसेच मागणी पूर्ण झाली नाही, तर विधानभवनावर मोर्चा काढण्याचा इशारा देखील त्यांनी दिला.