गोंदिया - आरपीएफच्या टास्क पथकाने मोबाईल चोरट्याच्या मुसक्या आवळून त्याला अटक केली आहे. त्याच्याकडून तीन मोबाईल हस्तगत केले. ही घटना गोंदिया रेल्वे स्थानक परिसरात घडली.
रेल्वे स्थानकावर टाक्स पथक गुप्त पाळत ठेवत असताना फलाट न. ५ वरील गाडी क्र. ६८७१४ इतवारी-बालाघाट मेमू गाडीच्या समोर एक व्यक्ती विरुद्ध दिशेला उतरून संशयितरित्या जाताना दिसून आली. त्यावरून विचारपूस केली असता उडवाउडवीचे उत्तरे देत त्याने तिथून पळून जाण्याच्या प्रयत्न केला. मात्र, रेल्वे सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याचा पाठलाग करत त्याला पकडून रेल्वे पोलिसांच्या स्वाधीन केले.
सुनील कुमार लांजेवार (वय २५ रा. बालाघाट) असे त्याचे नाव आहे. त्याची तपासणी केली असता त्याच्याकडून ३ मोबाईल मिळाले असून त्याने मोबाईल चोरी केले असल्याचे सांगितले. दि.२३ मे रोजी गणेस महतो (वय २१. रा. एम आय डी सी शुभलक्ष्मी राईस मिल) हे रेल्वे स्थानकावर विश्राम करत असताना त्यांचा कार्बन मोबाईल चोरीला गेला होता. तसेच आय-टेल मोबाईलमध्ये असलेल्या नंबरवर संपर्क केले असता महेंद्र मित्तल (रा. रायगड) यांच्याशी संपर्क झाला. त्यांचा मोबाईल गोंदिया रेल्वे स्थानक येथून चोरी झाला होता. मिळालेल्या माहितीनुसार तिन्ही मोबाईल हे चोरीचे असल्याचे निष्पन्न झाले असून चोरट्याविरूध्द गोंदिया रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.