गोंदिया : गेल्या एका वर्षात महाविकास आघाडी सरकारने अनेक संकटांना तोंड दिले. विशेषतः कोरोना महामारीच्या संकटातही उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात या सरकारने एक वर्ष पूर्ण केले, ही अत्यंत समाधानाची बाब असल्याचे मत खासदार प्रफुल पटेल यांनी शनिवारी व्यक्त केले. ते नागपूर पदवीधर मतदार संघाचे उमेदवार अभिजित वंजारी यांच्या प्रचारसभेत बोलत होते. या प्रचारासाठी विधानसभा अध्यक्ष नाना पटोलेही उपस्थित होते.
कर्जमाफी करुन दाखवली..
महाविकास आघाडी सरकारने सत्तेत येण्यापूर्वी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. सत्तेत आल्यानंतर पहिले काम आम्ही ते केले. राज्य सरकार आर्थिक संकटात असतानाही बोनसचे संपूर्ण १,४०० कोटी रुपये आम्ही विदर्भातील शेतकऱ्यांना दिले. यासोबतच पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा याठिकाणी उसाची लागवड मोठ्या प्रमाणात होते. तेथील साखर कारखान्यांनासुद्धा आमच्या सरकारने हमीभाव दिला आहे. मुंबईसारख्या शहरांमध्ये ई-प्रकल्पांना चालना देण्याचे कामही आमच्या सरकारने केले आहे, असे पटेल म्हणाले.
केंद्राने कृषी कायद्यांमध्ये बदल करावा..
दिल्लीमध्ये शेतकऱ्यांनी केंद्र सरकारला घेराव घातला आहे. अशा प्रकारचे आंदोलन आम्ही यापूर्वी कधी नव्हते पाहिले. शेतकऱ्यांवर मोठ्या प्रमाणात पाण्याचा, अश्रुधुरांचा मारा करुनही ते मागे हटत नाहीयेत, यातच त्यांचा रोष दिसून येत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने आता तरी आपले डोळे उघडून कृषी कायद्यांमध्ये बदल करावा अशी मागणी प्रफुल पटेलांनी केली. तसेच, केंद्राने कृषी कायदे आणण्यापूर्वी शरद पवार, प्रकाशसिंग बादल किंवा देवेगौडा, राजू शेट्टी अशा लोकांसोबत चर्चा करायला हवी होती, असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.
हेही वाचा : आमदार भारत भालके अनंतात विलीन; उपमुख्यमंत्री अजित पवारांनी वाहिली श्रद्धांजली