गोंदिया - राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी पत्नीसह गोंदियात मतदानाचा हक्क बजावला. या विधानसभा निवडणुकीत राज्यात परिवर्तन होणार असून, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार येणार असल्याचे वक्तव्य त्यांनी केले.
मागील ५ वर्षात भाजप सरकारने काहीही विकास केला नाही. देशात आणि राज्यात मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत. आमच्या सरकारच्या काळात आम्ही चांगले काम केले होते. मात्र, भाजपने विकासाकडे पूर्णत: दुर्लक्ष केल्याचे प्रफुल्ल पटेल म्हणाले.
संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या राज्य विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदानाला सुरूवात झाली आहे. विधानसभेच्या २८८ जागा, तर सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठी सोमवारी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होईल. आज राज्यातील तब्बल ३,२३७ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद होणार आहे.
किती मतदार बजावणार मतदानाचा हक्क? -
राज्यात ८ कोटी ९८ लाख ३९ हजार ६०० मतदार आहेत. यामध्ये पुरुष मतदार - 4 कोटी 68 लाख 75 हजार, 750, महिला मतदार - 4 कोटी 28 लाख 43 हजार 635, तृतीयपंथी मतदार- 2 हजार 634 आहेत, दिव्यांग मतदार - 3 लाख 96 हजार आहेत, सर्व्हिस मतदार- 1 लाख 17 हजार 581 आहेत.