गोंदिया - जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी जिल्ह्यातील सर्व अवैध धंद्यावर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार तिरोडा पोलिसांनी कार्यवाही करत ग्राम रामाटोली सिल्ली येथे छापेमारी केली. या ठिकाणी एकाच घरात चार दारू निर्मितीच्या भट्ट्या सुरू होत्या. यावर कारवाई करत पोलिसांनी तब्बल 4 लाख 6 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी संजय सोविंदा बरेकर (वय 35 रा. रामाटोली सिल्ली) याला अटक करण्यात आली आहे.
सहायक पोलीस निरीक्षक ईश्वर हनवते, सहायक पोलीस निरीक्षक अभिजीत जोगदंड व पोलीस उपनिरीक्षक अशोक केंद्रे हे मंगळवारी आपल्या स्टाफसह पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी त्यांना गोपनीय सूत्रांनी माहिती दिली की, रामाटोली सिल्ली येथे संजय सोविंदा बरेकर हा हातभट्टीने दारू गाळून विक्रीचा व्यवसाय करीत आहे. या माहितीवरून पोलिसांनी दोन पंचांना सोबत घेवून संजय बरेकर याचे घर गाठले व त्याची चौकशी केली. तसेच त्याची घरझडती करायचे असल्याचे सांगितल्यावर त्याने नकार दिला. त्यानंतर पोलिसांनी पंचासमक्ष त्याच्या घराची झडती घेतली असता, त्याच्या घरामध्ये 4 दारू भट्ट्या सुरू असल्याचे आढळून आले.
पोलिसांनी त्याच्या घराच्या परिसराची झडती घेतली असता, आरोपीच्या घरामागे 230 प्लास्टिक पोत्यामध्ये तब्बल 4600 किलो मोहाचा सडवा आढळून आला. याची किंमत 3 लाख 68 हजार रुपये इतकी होते. 20 प्लास्टिक ड्रममध्ये १०० रुपये प्रतिलिटर प्रमाणे तब्बल 200 लीटर हातभट्टीची दारू पोलिसांना आढळून आली. यासह दारू निर्मितीसाठी लागणारे इतर साहित्य असा एकूण 4 लाख 6 हजार 400 रूपयांचा माल अवैधरीत्या आरोपीच्या घरात आढळून आला.
या प्रकरणी पोलिसांनी सर्व मुद्देमाल जप्त करत आरोपीला कलम 41 (1) (अ) सीआरपीसी अन्वये नोटीस देण्यात आली आहे. पोलीस शिपाई विदेश अंबुले यांच्या तक्रारीवरून आरोपी संजय सोविंदा बरेकर (वय 35) रा. रामाटोली सिल्ली याच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम 65 (ब) (क) (ड) (ई) (फ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस नायक बांते करीत आहेत. सदर कारवाई सपोनि ईश्वर हनवते, सपोनि अभिजीत जोगदंड, पोउपनि अशोक केंद्रे, पोलीस शिपाई विदेश अंबुले व स्टाफने ही कारवाई केली.