गोंदिया - लोकलेखा समितीचे अध्यक्ष तथा गोंदिया विधानसभा क्षेत्राचे काँग्रेसचे आमदार गोपालदास अग्रवाल हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चेला जोरदार पेव फुटले आहे. त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेवरून वातावरण तापले आहे. काही भाजप कार्यकर्त्यांनी आमदार अग्रवाल यांच्या भाजप प्रवेशाचा विरोध करण्यासाठी जलाराम लॉन येथे सभा घेउन जोरदार शक्तीप्रदर्शन केले. यावेळी दोन हजार पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपले राजीनामे सादर करत आपली नाराजगी दर्शवली आहे.
आमदार अग्रवाल यांना भाजपमध्ये प्रवेश आणि उमेदवारी देत असाल तर आमचे राजीनामे मंजुर करा, अशी भुमिका त्यांनी घेतली. त्यामुळे भाजपमधील वातावरण तापले आहे. मागच्या आठवड्यात खमारी येथे झालेल्या भुमिपुजन कार्यक्रमात मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आमदार गोपालदास अग्रवाल यांना सांमावून घ्या, असे पालकमंत्री परिणय फुके यांना सांगितले होते. तेव्हापासुनच आमदार अग्रवाल हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा चर्चेला उत आला आहे. त्यांच्या प्रवेशाच्या चर्चेमुळे गोंदिया विधानसभा क्षेत्रातील भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये कमालीचा असंतोष आहे. काहीही झाले तरी आमदार अग्रवाल यांना भाजपमध्ये प्रेवेश देण्यात येऊ नये, अन्यथा आम्ही आपल्या पदाचा आणि पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देऊ अशी भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली आहे.