गोंदिया - जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भाग असलेल्या अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील नावेगवबांध येथे नागरिकांना एकाच वेळी एकाच ठिकाणी शासनाच्या विविध योजनांची माहिती मिळावी म्हणून महाशिबिराचे आयोजन करण्यात आले. गोंदिया जिल्हा सेवा प्राधिकरण, जिल्हा न्यायालय, जिल्हाधिकारी कार्यालय आणि सर्व तालुका विधी सेवा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात गोंदिया जिल्ह्याच्या आठ तालुक्यातील 25 हजारांपेक्षा जास्त नागरिकांनी या शिबिराला हजेरी लावली. जवळपास शासनाच्या 70 विविध योजनांच्या माहितीचे स्टॉल याठिकाणी लावण्यात आले.
हेही वाचा -जिल्ह्यात बनलेला 'दाह' पाहण्यासाठी गोंदियाकरांची गर्दी
या महाशिबिराचे उद्घाटन मुबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती एस. जी. गिरडकर आणि विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते करण्यात आले. महाशिबिरात जिल्हातील सेवा प्राधिकरण, पोलीस विभागाच्या सायबर सेल, नक्षल सेल, महिला सेल, जिल्हा माहिती कार्यालयाच्या लोकराज्य, कृषी विभाग, एकात्मिक बालविकास प्रकल्प विभाग, महिला आर्थिक विकास महामंडळ, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामिण रोजगार हमी योजना, स्वच्छ भारत अभियान, आपत्ती व्यवस्थापन विभाग, आरोग्य विभाग, वन विभाग, समाज कल्याण विभाग, स्टेट बँक ऑफ इंडिया, कौशल्य विकास विभाग, राज्य मार्ग परिवहन महामंडळ, बँक ऑफ इंडिया, महावितरण, कामगार विभाग, महसूल विभाग, भूमिअभिलेख, जिल्हा रेशीम कार्यालय, लघुपाटबंधारे विभागांसह 70 स्टॉल लावण्यात आले होते.