गोंदिया- पोलीस खबऱ्या असल्याच्या संशयावरून नक्षलवाद्यांकडून इसमाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. रात्री १० ते १०.१५ वाजेच्या दरम्यान जिल्ह्यातील सालेकसा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या ग्राम मुरकुडोह क्र. १ येथे ही घटना घडली. भागाचंद दुर्वे (वय ५०, रा. मुरकुडोह) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
सालेकसा तालुक्यातील मुरकुडोह/दंडारी हे गाव अतिदुर्गम भागात आहे. १८ ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजताच्या सुमारास गावकरी झोपेत असताना 10 नक्षली गावात दाखल झाले. यामध्ये ६ पुरूष व ४ महिलांचा समावेश होता. दरम्यान मुरकुडोह येथील भागचंद मेहतर धुर्वे (व.५०) वर्ष व त्याचा मुलगा राजू भागचंद धुर्वे (व.३०) वर्ष या दोघांना नक्षलवाद्यांनी गावापासून जवळपास एक ते दिड किलोमीटर अंतरावर जंगल शिवारात नेले. येथे नक्षलवाद्यांकडून दोन्ही बापलेकांना जबर मारहाण करण्यात आली. तुम्ही पोलिसांना आपल्या घरासमोर कॅप्म लावण्यासाठी मदत का करता? असा सवाल नक्षलवाद्यांनी केला.
काही वेळानंतर नक्षलवाद्यांनी राजू भागचंद धुर्वे याला त्या ठिकाणाहून घरी जाण्यास सांगितले. त्यानंतर काही वेळातच भागचंद धुर्वेवर गोळी झाडण्यात आली. या घटनेची माहिती राजूने कुटुंबासह गावकऱ्यांना दिली. दरम्यान गावकरी भागचंदच्या शोधात घटनास्थळाकडे पोहोचले असता भागचंद जखमी अवस्थेत आढळला. त्याचबरोबर, पोलिसांना मदत केल्यास कुटुंबाचीही हत्या करण्यात येणार, असे लिहिलेले पत्र घटनास्थळी सापडले.
गावकऱ्यांनी जखमी भागचंदला घटनास्थळावरून घरी आणले. मुरकुडोह हे गाव अतिदुर्गम असल्याने जखमी भागचंदला उपचारार्थ आरोग्य संस्थामध्ये हलविण्यासाठी कसलेही साधन नव्हते त्यामुळे त्याचा काही वेळातच मृत्यू झाला. या घटनेची माहिती दुसऱ्या दिवशी सालेकसा पोलिसांना देण्यात आली. फिर्यादी राजू धुर्वेच्या तक्रारीवरून नक्सली कमांडर डेविड, रानू यांच्यासह एकूण १० जणांविरूध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या घटनेमुळे सालेकसा तालुक्यासह आमगाव-देवरी विधानसभा क्षेत्रामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सदर घटनेसंदर्भात सालेकसा पोलिसांनी भादविच्या विविध कलमान्वये आणि बेकायदेशीर हालचाली प्रतिबंधात्मक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू आहे.
हेही वाचा- गोंदियात महिला सखी मतदान केंद्राचे आकर्षण