गोंदिया - गेल्या दीड वर्षांपासून देशासह जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनामुळे अनेकांची कुटुंबे चव्हाट्यावर आली आहेत. अनेकांची घरे उद्ध्वस्त झाली. कोरोनाने अनेकांना पोरके केले. अनेकजण बेरोजगार झाले. मात्र राज्यात असंही एक गाव आहे जिथे आतापर्यंत कोरोनाने शिरकावरच केला नाही. आमगाव तालुक्यातील करंजी असे या गावाचे नाव आहे. 2780 लोकसंख्या असलेले हे गाव आहे. या गावात कोरोनाच्या दोनही लाटेमध्ये एकाही व्यक्तीला कोरोनाची लागण झाली नाही. ग्रामस्थांनी एकत्र येऊन कोरोनाविरोधात लढा उभारला आणि तो यशस्वी देखील करून दाखवला.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 'असे' केले नियोजन
गेल्या वर्षी मार्च महिन्यापासून देशात कोरोनाच्या प्रादुर्भावाला सुरुवात झाली. हळूहळू कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत जाऊन राज्यासह गोंदिया जिल्ह्यापर्यंत येऊन पोहोचला. कोरोनाला आळा घालण्यासाठी गावच्या सरपंचांनी पुढाकार घेतला. सरपंच हंसराज चुटे यांनी ग्रामपंचायत सदस्य, आजी, माजी पदाधिकारी, डॉक्टर, शिक्षक व गावातील तरुणांना सोबत घेऊन, प्रशासनाने आखून दिलेल्या निर्देशानुसार कोरोनाला रोखण्यासाठी उपाययोजना आखल्या. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध समित्या तयार करण्यात आल्या, ज्यामध्ये दक्षता समिती, कोविड19 समिती, आदिवासी खावटी समिती, कुटुंब सर्वेक्षण वार्ड निहाय समिती, विलगिकरण व मदत कार्य समिती, लसीकरण समिती अशा विविध समित्या तयार करण्यात आल्या. या समित्यांच्या मार्फत गावात जनजागृती करण्यात आली. गावाचे निर्जंतुकीकरण, साफ-सफाई, घरातून बाहेर पडताना मास्क वापर, त्याचबरोबत गावात वावरत असताना योग्य त्या सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे यावर भर देण्यात आला. या सर्व उपाय योजनांमुळे कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेमध्ये एकाही व्यक्तीला कोरोनाची लागण झाली नाही.
कोरोनाच्या तीसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांची तयारी
कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत गावात कोरोनाचा शिरकाव झाला नाही, आता कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र गावात तिसऱ्या लाटेत देखील कोरोनाचा शिरकावर होऊ देणार नाही, असा निर्धार येथील ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. तशी ग्वाही गावचे सरपंच हंसराज चुटे यांनी मुख्यमंत्र्यांना व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून दिली आहे.
गाव कोरोनामुक्त ठेवण्यासाठी शिक्षक व डॉक्टरांची मदत
गाव कोरोनामुक्त ठेवण्यासाठी तेथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रातील डॉक्टर आणि शिक्षकांचे देखील मोलाचे योगदान आहे. शाळा प्रशासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आठ वार्ड तयार केले होते. प्रत्येक वार्डसाठी एका शिक्षकाची नियुक्ती करण्यात आली होती. हे शिक्षक आशा वर्करसोबत फिरून प्रत्येक वार्डात कोरोनाबाबत जनजागृती करत होते.
लसीकरणावर भर
कोरोनाला रोखायचे असेल तर लसीकरणाशिवाय पर्याय नाही, हे लक्षात घेऊन गावामध्ये अधिकाधिक लोकांचे लसीकरण करण्यात आले आहे. गावात 45 वर्षांच्या वरील 872 नागरिक असून, आतापर्यंत त्यापैकी 693 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. उर्वरीत नागरिकांचे लवकरच लसीकरण करण्यात येईल अशी माहिती स्थानिक प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.
करंजी प्रमाणेच राज्यातील याही गावात नाही कोरोनाला थारा
संपूर्ण जगाला कोरोनाचा विळखा पडलेले असताना महाराष्ट्रात करंजीप्रमाणेच आणखी एक गाव असे आहे की, जिथे आजही कोरोना पोहोचू शकला नाही. सांगलीच्या खानापूर तालुक्यातील बाणूरगड या गावात अद्याप कोरोनाचा शिरकाव होऊ शकला नाही. त्यामुळे हे गाव आजही कोरोनामुक्त गाव आहे. गावाच्या एकजुटीतेमुळे बाणूरगडकरांनी कोरोनाला वेशीवर रोखण्यात सलग दुसऱ्या वर्षी यश मिळवले आहे.
'कोरोनामुक्तीचा बाणूरगड पॅटर्न'
गावात कोरोनाला शिरकाव करू न देण्याचा चंग बाणूरगडकरांनी बांधला. त्यानुसार, गावात दक्षता समिती स्थापन करण्यात आली. या समितीच्या माध्यमातून गावकऱ्यांनी गावाच्या वेशीवर कोरोनाला आजही रोखून ठेवले आहे. त्यामुळे बाणूरगडमध्ये अद्यापही एकही कोरोना रुग्ण आढळून आला नाही. कारण याठिकाणी कोरोनाबाबत घेण्यात येणाऱ्या सर्व नियमांचे कटाक्षाने पालन केले जात आहे. अगदी मास्क लावण्यापासून बाहेरून येणाऱ्या व्यक्तीचे क्वारंटाइन, अशी प्रत्येक काळजी घेण्यात येते. या सर्व बाबींवर ग्राम दक्षता समिती करडी नजर ठेवते. यामुळे बाणूरगडला कोरोना वेढा पडू शकला नाही.
आसपासच्या गावात कोरोनाचा वेढा
जगभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे. मात्र, बाणूरगडच्या आजूबाजूला असणाऱ्या गावात पहिल्या लाटेपासून कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. मात्र, बाणूरगडकरांनी आतापर्यंत कोरोनाला थारा दिला नाही. त्यामुळे कोरोनामुक्तीचा बाणूरगड पॅटर्न सगळीकडे चर्चेत आहे. या गावाचे कौतुक होत आहे.
खरातवाडीने कोरोनाला रोखले गावच्या वेशीवर
सांगली जिल्ह्यातीलच आणखी एक गाव असे आहे की, जिथे अद्याप कोरोनाचा शिरकावर झालेला नाही.वाळवा तालुक्यातील खरातवाडीमध्ये अद्याप कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही. या गावाची लोकसंख्या 1 हजार 278 एवढी असून, गावात 230 कुटुंबांचे वास्तव्य आहे. गावाच्या आसपास अवघ्या 1 किलोमीटर अंतरावर कोरोनाचे रुग्ण आढळत असताना खरातवाडीमध्ये अद्याप एकही कोरोनाबाधित आढळून आलेला नाही. याचे सर्व श्रेय ग्रामस्थांनी कोरोना काळात केलेल्या उपायोजनांना जाते. गावात राबवण्यात आलेल्या उपाययोजनांमुळेच ग्रामस्थांनी कोरोनाला गावाच्या वेशीवरच रोखले आहे.
कोरोनाला रोखण्यासाठी उपाययोजना
कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी ग्रामस्थांच्या वतीने विविध उपायोजना राबवण्यात आल्या. यामध्ये संपूर्ण गावात इलेक्ट्रॉनिक पंपाद्वारे सोडियम क्लोराइड, तसेच फॉलीडॉल पावडरची फवारणी कण्यात येत आहे. परगावाहून गावात आलेल्या लोकांना घरीच राहण्याच्या सक्त सूचना देण्यात येतात. तसेच माहिती पत्रके आणि ध्वनिक्षेपकावरून कोरोनाबाबत लोकप्रबोधन करण्यात येत आहे. तसेच शासनाच्या आदेशानुसार ग्रामस्थांनी कमिटीची स्थापना केली असून, जबाबदाऱ्या वाटून घेतल्या आहेत. या गावात दुसऱ्या लाटेत देखील आतापर्यंत एकही रुग्ण आढळलेला नाही. यासाठी पंचायत समिती सदस्य ऍड.विजय खरात, सरपंच पृथ्वीराज खरात, उपसरपंच सिंधुताई खरात, ग्रामविकास अधिकारी दीपक गावडे तंटामुक्त अध्यक्ष भानुदास खरात, अविनाश खरात, ग्रामपंचायत कर्मचारी नानासाहेब गायकवाड, पोलीस पाटील कृष्णा खरात हे विशेष परिश्रम घेत आहेत. ही अशी काही प्रतिनिधिक उदाहारने आहेत ज्या गावांनी कोरोनाला दूर ठेवले आहेत. राज्यात अशी अनेक गावे आहेत ज्यांनी कोरोनाचा संसर्ग होऊ दिला नाही. ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन केलेल्या प्रयत्नामुळेच आतापर्यंत या गावाचा कोरोनापासून बचाव झाला आहे.
हेही वाचा - अजिंठा लेणी परिसरात हिंस्र प्राण्यांचा वावर; बिबट्या की वाघ याबाबत संभ्रम
हेही वाचा - बाबो ..! एक कोब्रा कोंबड्यांच्या पिंजऱ्यात, दुसरा चायनीच सेंटरच्या कपाटात