गोंदिया - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल हे दोन दिवसाकरिता गोंदिया-भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. रविवारी गोंदिया येथे बोलत असताना पटेल यांनी केंद्र सरकारच्या नवीन कृषी कायद्यावर मत व्यक्त करताना संसदेत कृषी विषयक विधेयकं घाईने मंजूर केली असल्याची टीका केली. गोंदिया येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
पटेल म्हणाले, की शेतकरी बिल संसदेत फार घाई गर्दीने पास करण्यात आले, इतकी घाई करायला नको होती. त्यावेळीस माझ्या भाषणात मी सांगितले होते की शरद पवार यांच्या सारखे अनुभवी नेते, ज्यांना शेतीची माहिती आहे. तसेच देवेगौडा, प्रकाशसिंग बादल, राजू शेट्टी असे कृषीविषयक माहिती असणारे अनेक नेते आहेत. या सारख्या तज्ज्ञ लोकांशी केंद्र सरकारने चर्चा करायला पाहिजे होती. त्यानंतर त्यातील उणीवा दूर करून हे विधेयक मंजूर केले असते तर शेतकऱ्यांनीही ते स्वीकारले असते.
मी देखील या बिलाचा अभ्यास केला आहे. त्यात अनेक त्रुटी आहेत, अनेक चुकीच्या तरतुदी या बिलात समाविष्ट आहेत, सोबतच या बिलात एम्एसपी म्हणजे आधारभूत खरेदी किमतीचा उल्लेख कुठेच नाही. बिल पास झाल्यावर पंतप्रधानांनी सांगितले की या शेती मालाची खरेदी एमएसपीवर आधारीत आहे आणि ती नेहमीसाठी चालू राहिल. मात्र, जर त्या बिलामध्ये उल्लेख झाला असता, तर बऱ्याच शेतकऱ्यांना त्याचाही फायदा झाला असता, असेही मत पटेल यांनी यावेळी व्यक्त केले.
केंद्राच्या या कायद्याने मोठ-मोठ्या कंपन्यांना फायदा मिळणार आहे. मात्र, सरकार म्हणते की शेतकऱ्यांना याचा फायदा होईल. त्यामध्ये अशी काही तरतूद करणे गरजेचे आहे, की उद्या कोणत्याही कंपनीने शेतकऱ्यांचे शोषण केले. तर त्याच्यासाठी पर्याय उपलब्ध असायला हवा. मात्र, या विधेयकामध्ये त्याचा कुठेही उल्लेख नाही. म्हणून सर्व पक्षांनी या बिलाचा विरोध केला असल्याचेही पटेल यांनी यावेळी स्पष्टीकरण दिले.