गोंदिया - जिल्ह्यातील प्रसिद्ध व्याघ्र प्रकल्प म्हणून ओळख असलेल्या नवेगाव-नागझिरा व्याघ्र वन्यपरीक्षेत्र मागच्या वर्षी मार्च महिन्यापासून कोरोनामुळे नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील पर्यटन बंद करण्यात आले होते. मात्र, काल (शुक्रवारी) 1 ऑक्टोबरपासून वन्यजीव सप्ताहाच्या निमित्ताने नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील १० गेट पर्यटकांसाठी सुरू करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात हमखास वाघोबाचे दर्शन होत असल्याने पर्यटकांना सफारीचा आनंद घेण्यासाठी पर्यटक आले आहेत.
वाहनाला वनपरिक्षेत्र अधिकारी व वन विभाग कर्मचारी आणि पर्यटकांच्या उपस्थितीत हिरवी झेंडी दाखविण्यात आली. आज सफारीचा कोटा शिल्लक असल्याने ऑफलाईनद्वारेही बुकिंग करून सफारी करण्याचा पर्यटकांनी आनंद घेतला आहे. नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील पर्यटनाचे आभासी सफारी आरक्षण व निवास व्यवस्था संकेतस्थळावरून सुरू करण्यात आले. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण राज्य शासन, स्थानिक जिल्हा प्रशासनाद्वारे वेळोवेळी निर्गमित होणाऱ्या कोरोनासंदर्भातील सूचनांचे पालन करून पर्यटकांनी जंगल सफरीला सुरुवात केली. बऱ्याच कालावधीनंतर पुन्हा वनभ्रमंतीची संधी मिळाली असल्याने राज्यभरातील वन्यप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
हेही वाचा - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गरब्यावर बंदी योग्यच - किशोरी पेडणेकर
आजच्या धकाधकीच्या जीवनात माणसाला स्वत:साठीही वेळ काढणे कठीण झाले आहे. त्यात शहरीकरणामुळे निसर्गाच्या सानिध्यात राहणे अशक्य होत चालले आहे. यामुळे आता सिमेंट-काँक्रिटच्या जंगलातुन निघुन काही वेळ निसर्गाच्या सानिध्यात घालविण्यासाठी कित्येकजण ग्रामीण भागाची किंवा जंगलांची वाट धरतात. यामुळे वनपर्यटनाची ओढ सर्वांनाच लागली असल्याचे दिसत आहे. मात्र, कोरोनामुळे त्यांच्या या आनंदावरही विरजण पडले होते. कोरोना व त्यानंतर आता अंतर्गत व्यवस्थापनाच्या दृष्टीने वन पर्यटन बंद होते. मात्र, १ ऑक्टोबर शुक्रवारपासुन वन पर्यटन सुरू झाले. त्यानुसार जिल्ह्यातील नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पसुध्दा पर्यटनासाठी उघडण्यात आले आहे. प्रकल्पाचे १० गेट सुरू करण्यात आले आहेत. यामुळे वन्यजीवप्रेमींना आता जंगलसफारी करता येणार असुन वाघोबाचे दर्शनही घेता येणार आहे.
वाहन क्षमतेनुसार मिळणार प्रवेश -
कोरोनामुळे आतापर्यंत वाहन क्षमतेच्या ५० टक्के पर्यटकांना प्रवेश दिला जात होता. त्यातही वृध्दांना पर्यटनासाठी परवानगी देण्यात आलेली नव्हती. मात्र, कोरोना परिस्थिती नियंत्रणात असल्याने या अटींमध्ये शिथिलता देण्यता आली आहे. यानुसार वाहन क्षमतेनुसार परवानगी दिली जात आहे. याशिवाय ऑनलाईनव्दारे व सफारीचा कोटा शिल्लक असल्याचा ऑफलाईनव्दारेही पर्यटकाना प्रवेश दिले जात आहे.