गोंदिया - भारतीय जनता पक्षाकडून मुस्लीम समाजाविषयी सोशल मीडियावर चुकीचे मॅसेज पसरवण्यात येत आहेत. हे भाजपचे गलिच्छ राजकारण असल्याची टीका मुस्लीम समाजाच्या नेत्यांनी केली आहे. ३१ मार्चला आमदार डॉ. परिणय फुके यांनी गोंदिया येथील सर्व मुस्लीम बांधवांना भेटून समाजाच्या समस्या जाणून घेऊन त्यांच्याशी लोकसभा निवडणूक संदर्भात चर्चा केली. यावेळी सर्व मुस्लीम समाजाच्या वतीने भाजपच्या उमेदवाराला आपले समर्थन जाहीर केले, असे मॅसेज पसरवण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर मुस्लीम नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली.
आज घडीला जिल्ह्यात मुस्लीम समाजाची दीड लाख मतदार संख्या आहे. तसेच मुस्लीम समाज आज वेगवेगळ्या गटात विभागला असला तरी कोणत्याही पक्षाला समर्थन दिलेले नाही. केवळ दोन-चार लोकांच्या मर्जीने समाज चालत नाही, यासाठी सर्वांची सहमती घेतली जाते. असे कोणतेही कृत्य न करता मुस्लीम समाजाला भारतीय जनता पक्षाकडून बदनाम करण्याची ही एक खेळी असल्याचे यावेळी पत्रपरिषदेत मुस्लीम नेत्यांनी म्हटले आहे. भारतीय जनता पक्षाने समाजाच्या दीड लाख मतांवर डोळा ठेवून हे कृत्य केलेले आहे. मात्र, त्यांची ही खेळी त्यांच्यावरच उलटणार असल्याची टीका समाजाचे ताजिया याकुब भाई तसेच वरिष्ठ नेत्यांनी केली आहे. ३१ मार्चला आमदार डॉक्टर पुराने फुके यांनी बोलावलेल्या सभेला गेलेल्या सुभान भाई यांनी सांगितले, की सदर सभेत फक्त समाज बांधवांसह आमदारांची भेटगाठी झाल्या. याप्रसंगी निवडणुकी संदर्भात कोणतीही चर्चा करण्यात आली नाही.