गोंदिया - शहरातील खासगी सहयोग रुग्णालयाच्या परिसरात रवीप्रसाद राधेलाल बंबारे (वय ३४) यांचा धारदार शस्त्राचा वार करून शनिवारी (ता. १४) रात्री १०.४५ सुमारास खून करण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी पथक तयार करून २४ तासांच्या आत शाम उर्फ पिटी चाचेरे (वय ३२), शुभम परदेशी (वय २९), प्रशांत भालेराव उर्फ छोटा काली मातादीन (वय ४०) आणि शाहरूख शेख (वय २३) (सर्व रा. गोंदिया) यांना अटक करण्यात आली.
हेही वाचा - बिबट्याने दोन बकऱ्यांचा पाडला फडशा; शेतकऱ्यात भितीचे वातावरण
२४ तासांच्या आत आरोपींना अटक
सहयोग रुग्णालय परिसरात रवीप्रसाद बंबारे याची धारदार शस्त्राने हत्या करून आरोपी पसार झाले होते. पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी स्थानिक गुन्हे शाखा, रामनगर पोलीस आणि गोंदिया शहर पोलिसांचे विविध पथक तयार करून आरोपींच्या शोधार्थ रवाना केले. या प्रकरणातील आरोपी पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओ वाहनाने (एमएच १४, वाय ७७७७) पांगळी जंगल परिसरात गेले असल्याचे माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी पांगडी, खर्रा परिसरात शोधमोहीम राबविली. खर्रा पहाडीजवळ पोलिसांनी पांढऱ्या रंगाचे स्कॉर्पिओ वाहन उभे दिसले. वाहनाला घेराव करून पोलिसांनी शाम उर्फ पिटी रमेश चाचेरे, शुभम गोपाल चव्हाण उर्फ परदेशी, शाहरूख रज्जाक शेख आणि प्रशांत उर्फ छोटा काली मातादीन ज्ञानेश्वर भालेराव यांना अटक केली. त्यांनी गुन्ह्याची कबुली देत रेतीच्या व्यवसायातून आर्थिक व्यवहारातून खून केल्याचे सांगितले. ही कारवाई पोलिसांनी अवघ्या २४ तासांच्या आत आरोपींना अटक करून बेड्या ठोकल्या.
आरोपींविरुद्ध कलम ३०२, ३४ भादंवि गुन्हा नोंद केला असून आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असून न्यायालयाने आरोपीना २२ जानेवारीपर्यंत आरोपींना पोलीस कोठडी देण्यात आली आहे. पुढील तपास रामनगर पोलीस करत आहे.
हेही वाचा - धक्कादायक..! कोरोना काळात मुंबईत गुन्हेगारी वाढली