गोंदिया - महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या पाहता मध्यप्रदेश सरकारने येथील बस फेऱ्या बंद केल्या आहेत. त्यानुसार गोंदिया आगारातून मध्यप्रदेशकडे जाणाऱ्या 44 फेऱ्या व छत्तीसगड येथील 2 फेऱ्या बंद करण्यात आल्या आहेत. येत्या 31 मार्चपर्यंत या फेऱ्यांवर बंदी घालण्यात आली असून याबाबत गोंदिया आगाराला तसे आदेश मिळाले आहेत.
राज्यातील विविध शहरात कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशा स्थितीत प्रवाशांची ये-जा सुरू राहिल्यास त्यातून कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे मध्यप्रदेश सरकारने महाराष्ट्रात ये-जा करणाऱ्या बस फेऱ्यांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. 20 मार्चपासून येत्या 31 मार्चपर्यंत या फेऱ्यांवर बंदी घालण्यात आली आहे. म्हणजेच, मध्य प्रदेशात व छत्तीसगड राज्यात जात असलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या सर्वच बसेस आता मध्यप्रदेश व छत्तीसगड राज्यात जाणार नाहीत.
मध्यप्रदेश शासनाने दिले पत्र मात्र छत्तीसगड प्रशासनाचे कोणतेही पत्र नाही
गोंदिया आगाराला 19 मार्चला सायंकाळी बसफेऱ्या बंद करण्याचे आदेश मध्यप्रदेश शासनाने पत्राद्वारे मिळाले आहेत. विशेष म्हणजे, मध्यप्रदेश राज्याची सीमा जेमतेम 30 किलोमीटर असून तेथील नागरिक मोठ्या प्रमाणात दररोज गोंदियात येतात. यात बसने त्यांचा प्रवास जास्तीतजासत प्रमाणात होतो. मात्र, आत बसफेऱ्या बंद झाल्याने त्यांची गैरसोय होत आहे. शिवाय, गोंदिया आगाराच्या उत्पन्नावरही याचा परिणाम होत आहे. मात्र, सुरक्षेच्या दृष्टीने दोन्ही राज्यांच्या सरकारने घेतलेला हा निर्णय योग्यच आहे. गोंदिया आगारातून मध्यप्रदेश राज्यात एकूण 44 फेऱ्या जात होत्या. तर छत्तीसगड राज्यात 2 फेऱ्या जात होत्या.
बस फेऱ्या बंद झाल्याने गोंदिया आगारला दररोज सात लाखांचा फटका
वाढत्या कोरोनाग्रस्तांमुळे गोंदिया आगाराने मध्यप्रदेश व छत्तीसगड राज्यातील फेऱ्या बंद केल्या आहेत. त्याचबरोबर अनेक ठिकाणच्या फेऱ्या कमी किंवा रद्द केल्या आहेत. यामुळे गोंदिया आगाराला दररोज सुमारे सात लाखांचा फटका बसत असल्याची माहिती आगार प्रमुख संजना पटले यांनी दिली.
हेही वाचा - रेल्वेची परीक्षा द्यायची की एमपीएससीची, एकाच दिवशी दोनही परीक्षा