गोंदिया- रक्षाबंधनाच्या निमित्ताने भाजपा महिला मोर्चाच्या वतीने 'शक्ती सन्मान' महोत्सवांतर्गत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राज्यभरातील महिलांकडून २१ लाख राख्या पाठविल्या जाणार आहे. या पार्श्वभूमीवर गोंदिया जिल्ह्यातूनही २० हजारांवर राख्या पाठविल्या जाणार असल्याची माहिती, भाजपा महिला मोर्चा जिल्हाप्रमुख भावना कदम यांनी पत्रपरिषदेत दिली आहे.
शहरातील शासकीय विश्रामगृहात पत्रपरिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना कदम यांनी सांगितले की, प्रत्येक विधानसभानिहाय संयोजक, सहसंयोजक व मंडळनिहाय संयोजकांची नियुक्ती करण्यात आली आहे. ५३ जिल्हा परिषद प्रमुख, १०६ पंचायत समिती प्रमुखांची नियुक्ती करण्यात आली असून १ बुथवरुन १० च्या वर राख्या पाठविण्यात येणार आहे. १ ते १५ ऑगस्ट दरम्यान रक्षाबंधनाच्या निमित्ताने विविध क्षेत्रातील व विविध समाज घटकातील महिलांशी भाजपा महिला मोर्चा व भाजपा कार्यकर्त्यांकडून संपर्क साधून त्यांच्यापासून राखी संकलन कले जाणार आहे.
विशेष म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्र सरकारच्या व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राज्य सरकारच्या विविध विकास योजनांच्या लाभार्थी महिलांशी संपर्क साधण्यात येईल. या महिलांकडून मुख्यमंत्र्यासाठी राख्या स्विकारण्यात येणार आहे. महिलांशी संपर्क साधल्यानंतर भाजपचे कार्यकर्ते त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पत्र देऊन त्यांना राखीसोबत मुख्यमंत्र्यांना लेखी संदेश देण्याची विनंती करतील. त्यानंतर मुख्यमंत्र्यांना १६ ऑगस्ट रोजी मुंबई येथे 'शक्ती सन्मान' महोत्सवात या राख्या देण्यात येणार आहे.