गोंदिया - अरुणाचल प्रदेश (डिब्रुगड) येथे कर्तव्यावर असताना वीरगती प्राप्त झालेले महेंद्र भास्कर पारधी ( Martyr Mahendra Pardhi funeral gondia ) (वय 37) यांच्या पार्थिवावर काल शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. तिरोडा तालुक्यातील चिरेखनी दहन घाटावर त्यांचे अंत्यसंस्कार पार पडले. महेंद्र हे सैन्यदलात मराठा रेजिमेंटमध्ये होते. 16 वर्षे देशसेवेचे कर्तव्य बजावलेल्या महेंद्र यांना चिरेखनी गावातील, तसेच तिरोडा परिसरातील नागरिकांनी अखेरचा निरोप दिला.
हेही वाचा - Gondia Birsa Airport : बिर्शी ग्रामस्थांनी केले विमानतळावर भूमीपूजन
महेंद्र पारधी यांचे पार्थिव आज दुपारी तिरोडा तालुक्यातील चिरेखनी येथे त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आले. या ठिकाणी त्यांच्या कुटुंबीयांनी व नातेवाईकांनी अंतिम दर्शन घेतले. त्यांच्या निवासस्थानापासून अंत्ययात्रेला सुरुवात झाली. अमर रहे, अमर रहे महेंद्र पारधी अमर रहे, भारत माता की जय, वंदे मातरम अशा घोषणा देत नागरिकांनी मोठ्या प्रमाणात अंत्ययात्रेत सहभाग घेतला होता. त्यानंतर तिरोडा - बालाघाट मार्गे चिरेखनी मोक्षधामाकडे अंत्ययात्रा आली.
माजी खासदार डॉ. खुशाल बोपचे, माजी आमदार दिलीप बन्सोड, माजी आमदार हेमंत पटले, माजी नगराध्यक्ष सोनाली देशपांडे, उपविभागीय अधिकारी पुजा गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मडामे, तहसीलदार प्रशांत घोरुडे, पोलीस निरीक्षक योगेश पारधी, सरपंच शिलाबाई पारधी, जिल्हा सैनिक कल्याण संघटक जगदीश रंगारी यांनी पुष्पचक्र अर्पण केले. जिल्हा पोलीस दलाने 3 फैरी झाडून मानवंदना दिली. सैन्यदलातर्फेही मानवंदना देण्यात आली. महेंद्र पारधी यांचा मोठा मुलगा जानव पारधी याच्या हस्ते अग्नी देऊन अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी चिरेखनी गावातील, तसेच तिरोडा परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी सामूहिक शोकसभा घेण्यात आली.
महेंद्र पारधी यांच्या पत्नीचे नाव गायत्री असून त्यांना जानव (वय 10) व शिवाय (वय 4) नावाची दोन मुले आहेत. महेंद्र पारधी यांचे वडील भास्कर पारधी यांचा काही वर्षांपूर्वी मृत्यू झाला. आई चित्रकला पारधी हयात आहेत. महेंद्र यांना तीन भाऊ आहेत. मोठ्या भावाचे नाव चंद्रशेखर पारधी, दुसऱ्या क्रमांकाचे महेंद्र पारधी, तिसऱ्या क्रमांकाचे सोनू पारधी व चौथ्या क्रमांकाचे फनेंद्र पारधी अशा चौघा भावंडांचे कुटुंब आहे.
जिल्ह्यातील जवान हुतात्मा झालेला असताना जिल्ह्याचे प्रमुख असलेले जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांनी आज पार्थीव येताच जवानाच्या निवासस्थानी जाऊन श्रद्धांजली वाहणे महत्वाचे होते. मात्र, या अधिकाऱ्यांनी स्वतः न जाता आपल्या अधिनस्थ कर्मचाऱ्यांवर जबाबदारी सोपवून मोकळे झाल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा - Gondia Women Attacked : 'सुपारी किलर'ला महिला वकिलाने दिली दुसऱ्या महिलेच्या हत्येची 'सुपारी'.. आरोपी अटकेत