गोंदिया - नववर्ष साजरा करण्यासाठी प्रत्येकाच्या काहीतरी खास योजना असतात. गोंदिया जिल्ह्यातही नववर्षाच्या स्वागताची एक अनोखी प्रथा पाहायला मिळते. दरवर्षी नववर्षाच्या सुरुवातीला म्हणजे १ जानेवारीला घनदाट जंगलात एक यात्रा भरत असते. या जंगलात वसलेल्या 'मामा-भाचा' या देवस्थानात भाविक मोठ्या श्रद्धेने पूजा करतात. शिवाय त्यांच्या रूपातील झाडांना नवसही बोलतात. नववर्षाच्या स्वागताची ही अनोखी परंपरा गेल्या अनेक वर्षापासून येथील गावकरी साजरी करत आहेत.
अर्जुनी तालुक्यातील गिरोला (हेटी) गावाच्या घनदाट जंगल परिसरात 'मामा-भाचा' हे मंदिर स्थित आहे. दरवर्षी १ जानेवारीला मामा-भाच्याच्या या मंदिरात यात्रा भरते. भाविक मोठ्या श्रद्धेने तेंदूच्या झाडाखाली स्थित असलेल्या ह्या मूर्तींची पूजा करतात. ह्यातील मोठे झाड हे मामाचे आहे तर, लहान झाड भाच्याचे आहे. भाविक आपला नवस देखील इथे बोलतात. या यात्रेच्या सुरुवातीला एक अखंड ज्योती प्रज्वलित केली जाते. ह्या ज्योतीचे विसर्जन करून यात्रेची दुसऱ्या दिवशी सांगता केली जाते. गोंदिया तसेच भंडारा जिल्ह्यातील भाविक मोठ्या संख्येने दरवर्षी ह्या जंगलातील मंदिराला भेट देतात. एक प्रकारे झाडांबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारी ही यात्रा असते.
एका आख्यायिकेनुसार जवळपास ११० वर्षापूर्वी मामा-भाचे जंगलात झाडे तोडायला गेले होते. दरम्यान वाघाने केलेल्या हल्ल्यात त्या दोघांचा मृत्यू झाला. त्यांनतर, काही दिवसांनी काहीजण जंगलात झाडे तोडायला आले, त्यावेळी झाडे तोडताना त्या झाडातून रक्त निघू लागले. रक्त निघताना पाहून लोक घाबरुन पळून गेले. त्यारात्री झाडांनी त्या लोकांच्या स्वप्नात जाऊन आपण मामा-भाचा असल्याचे सांगितले आणि झाडे तोडू नका अशी विनंती केली. दुसऱ्या दिवशी झाड तोडणाऱ्यांनी जंगलात जाऊन त्या झाडांची पूजा केली, कालांतराने ह्याची चर्चा गावात पसरली आणि गावकरी देखील ह्या झाडांची पूजा करू लागले. त्या दोन झाडांखाली गावकऱ्यांनी मंदिराची उभारणीही केली.
गेल्या काही वर्षापासून ह्या ठिकांनी यात्रा भरते व भाविक आपले नववर्ष जंगलाच्या सानिध्यात साजरे करातात. तसेच ह्या ठिकांनी कोणत्याही झाडांची कत्तल होत नाही. शिवाय त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी देखील गावकरी घेतात. गिरोला या वनक्षेत्रापुढे नागझिराच्या अभियाराण्याला सुरुवात होते.
हेही वाचा - गोंदियात भरधाव दुचाकीची ट्रकला धडक, दोघांचा जागीच मृत्यू
मामा-भाचा मंदिर जरी घनदाट जंगलात वसले असले तरी, बुधवारी ह्या ठिकांनी यात्रेच्या निमित्ताने हजारो भाविक मंदिरात दर्शन घ्यायला आले होते. तुकारामांनी आपल्या अभंगातून वृक्षांच्या संवर्धनाचा संदेश दिला आहे. ह्या यात्रेच्या निमित्ताने का होईना ग्रामस्थ वर्षाचा पहिला दिवस झाडांच्या सानिध्यात घालवतात, शिवाय झाडांबद्दल आपुलकी व्यक्त करतात. ह्या ग्रामस्थांप्रमाणेच आपण देखील आपला निसर्ग अबाधित ठेवण्याचा निर्धार ह्या नववर्षात करण्याची गरज आहे हे नक्की.
हेही वाचा - गोंदियात रंगली सायक्लथॉन स्पर्धा, ३ हजारांपेक्षा जास्त स्पर्धकांनी नोंदवला सहभाग