गोंदिया - १ मे १९९९ रोजी भंडारा जिल्ह्याचे विभाजन होऊन नवीन गोंदिया जिल्हा अस्तित्वात आला. या घटनेला १ मे रोजी २० वर्षे पूर्ण झाली आहेत. या कालखंडात जिल्ह्यातील विकासाचा विचार केल्यास एक-दोन प्रकल्प वळगता सिंचनाचा अनुशेष, आरोग्य व शिक्षणाचा उडालेला बोजवारा या शिवाय जिल्ह्यात वाढत जाणाऱ्या बेरोजगारीचा प्रश्न भेडसावत आहे.
विशेष म्हणजे विकासाची स्वप्ने दाखवून सत्तेत आलेल्या सध्याच्या शासनाच्या काळात गोंदियाचा मागासलेपणाचा हा डाग पुसला जाईल का? असा प्रश्न निर्माण होत आहे. या जिल्ह्याला केंद्रातही मान मिळाला तसेच राज्यात कॅबिनेटमध्ये जागा मिळाली. मात्र, आज २० वर्षे लोटूनही अनेक शासकीय कार्यालये भंडारा येथेच असल्याने गोंदिया जिल्हा वासियांना अनेकदा भंडारा येथे जाऊन आपले काम करून घ्यावे लागते.
राज्याच्या अगदी सुरुवातीला पूर्व दिशेला वसलेला गोंदिया जिल्हा हा बहुतांशी आदिवासी क्षेत्र असलेला जिल्हा आहे. म्हणूनच जिल्ह्याची ओळख अतिदुर्गम व नक्षलग्रस्त म्हणून आहे. गोंदिया जिल्ह्याची निर्मिती झाल्यापासून जिल्हा व्यावसायिक व प्रशिक्षण अधिकारी, जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी, प्रादेशिक रस्ते वाहतूक अधिकारी, अन्न व औषध सहायक संचालक, शिक्षण अधिकारी, नियंत्रण शिक्षक, प्रदूषण नियंत्रण अधिकारी असे अनेक कार्यालये गोंदियात नसून ते आजही भंडारा जिल्ह्यात आहेत. त्यामुळे गोंदियातील लोकांना शारिरीक आणि मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. अनेक वेळा पैसे व वेळ द्यावा लागत असून काम होत नसल्याने अनेकदा निराशा येते. त्यामुळे गोंदिया जिल्ह्यात नसलेली शासकीय कार्यालये गोंदियात सुरु करण्यात यावी, अशी गोंदिया जिल्हा वासियांची मागणी आहे.
गोंदिया जिल्ह्यात एकूण ८ पंचायत समिती, ९ एकात्मिक बालविकास प्रकल्प, ५५६ ग्रामपंचायती, ४२ प्राथमिक आरोग्य केंद्र, २४५ प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, १२ ग्रामीण रुग्णालये, १०७७ जि. प. प्राथमिक शाळा, २२ माध्यमिक शाळा, १४ उच्च माध्यमिक शाळा, १६०० अंगणवाडी, १५० मिनी अंगणवाडी ७५ पशुवैधकीय श्रेणी १ व २ दवाखाने या शिवाय १३९२ माजी मालगुजारी तलाव, सिंचनासाठी २ मोठे सिंचन प्रकल्प, १० मध्यम प्रकल्प, १९ लघु प्रकल्प या प्रकारच्या सोयीसुविधा आहेत.
जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील जनतेची देखभाल व दरडोई उत्पन्न वाढीसाठी विविध योजना राबवून अस्तित्वात आहेत. मात्र, जिल्हा निर्मितीला आज २० वर्षे अवधी लोटूनही जिल्ह्यातील अनेक शासकीय कार्यालये भंडारा येथे असून गोंदिया जिल्हातील लोकांना आपले काम पूर्ण करण्याकरिता भंडारा येथे जावे लागत आहे.