गोंदिया - भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाराष्ट्रात नव्या ट्रान्सफर मंत्रालयाची स्थापना झाली असल्याची खोचक टीका ट्विटरवरुन सरकारवर केली होती. यावर उत्तर देताना विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी, राज्यात सत्तेत असलेले पक्ष आणि विरोधी पक्ष हे बाहेर एकमेकांवर आरोपप्रत्यारोप, टीका करत असतात. त्यामुळे त्यांच्या टीकांवर मी बाहेर काहीच बोलणार नाही. परंतू, हा मुद्दा सभागृहात आल्यावर त्यावर तोडगा काढला जाईल, असे पटोले यांनी म्हटले आहे.
गोंदिया जिल्ह्यातील सडक-अर्जुनी येथे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले हे आले होते. यावेळी त्यांना पत्रकारांनी चंद्रकांत पाटील यांचे ट्विट आणि सुशांतसिंह प्रकरणावर प्रश्न विचारले असता, त्यांनी आपले मत व्यक्त केले.
हेही वाचा - 'ट्रान्सफर मंत्रालय..! महाराष्ट्रात एका नव्या मंत्रालयाची स्थापना'
सुशांतसिंह प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी ट्विट करुन, "सर्वोच्च न्यायालयाने सुशांतसिंह राजपूत प्रकरणातील तपास सीबीआईच्या स्वाधीन करण्याचा आदेश दिला आहे. मला खात्री आहे की, महाराष्ट्र सरकार या निर्णयाचा आदर करून चौकशी प्रकियेत पूर्ण सहकार्य करेल. मला आशा आहे कि डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्याप्रकरणी सीबीआईमार्फत २०१४ मध्ये सुरु झालेल्या आणि अद्याप निराकरण होऊ न शकलेल्या चौकशी प्रक्रियेप्रमाणे या तपासकार्याची परिणती होणार नाही." या प्रकरणाबाबत विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना विचारले असता, त्यांनी सध्या या प्रकरणी राज्यात राजकीय परिस्थिती निर्माण झाली असून विधानसभा अध्यक्ष या नात्याने मी त्यावर कोणतीही प्रतिक्रिया करू शकणार नाही, असे म्हटले आहे.