गोंदिया - अर्जुनी मोरगाव वनपरिक्षेत्रात येणाऱ्या वडेगाव गावात एका विहिरीत पाच वर्षांचा बिबट्या पडल्याची घटना घडली. गावाच्या बाजूला जंगल परिसर असल्याने या ठिकाणी नेहमीच जंगली श्वापदांचा वावर असतो. काल रात्रीच्या सुमारास शेळीची शिकार करण्यासाठी बिबट्या पाठलाग करत होता. यावेळी तो विहिरीत पडला. घटना उघडकीस आल्यानंतर गावकऱ्यांनी तत्काळ वनविभागाला कळवले.
वनअधिकारी व वन विभागाची टीम घटनास्थळी पोहोचल्यावर त्यांनी रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले. अखेर पाच तासांच्या अथक प्रयत्नांनंतर बिबट्याला विहिरीबाहेर काढण्यात यश आले. काही वेळाने बिबट्याची तपासणी करण्यात आली. यावेळी त्याला कोणतीही इजा झाल्याचे समोर आले नाही. काही वेळाने वनअधिकाऱ्यांनी पुयार या जंगलक्षेत्रात बिबट्याला सोडून दिले.
दरम्यान, बिबट्याला रेस्क्यू करताना संपूर्ण गावातील लोक जमा झाले होते. या ठिकाणी मोठी गर्दी उसळली होती.
बिबट्या विहिरीत पडण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने गावातील विहिरींना कठडे बांधण्याची गरज वनविभागाने व्यक्त केली आहे. तसेच शिकारीसाठी बिबट्या मानवी वस्तीच्या जवळपास वावरत असल्याने रात्रीच्या वेळी एकटं जाण्याचे टाळा, असे आवाहन वन अधिकाऱ्यांनी केले आहे.