गोंदिया - जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील बोंडगावदेवी येथील यशवंत नेवारे यांच्या गोठ्यात शिरून बिबट्याने बांधलेल्या बोकडाला फस्त केले. ही घटना २० ऑक्टोबरला रात्री ११ ते १२च्या सुमारास घडली. दरम्यान, नेवारे यांना जाग आल्याने त्यांनी आरडाओरड करताच बिबट्याने पळ काढला.
गेल्या अनेक दिवसांपासून या परिसरात बिबट्याची दहशत पसरली असून वनविभागाचे कर्मचारी व अधिकारी याकडे दुर्लक्ष करत आहेत. दोन दिवसांआधी परिसरातील रामकृष्ण झोळे यांच्या घरातील कोंबड्या बिबट्याने फस्त केल्या होत्या. तर आता नेवारे यांच्या गोठ्यात बांधलेल्या बोकडाला बिबट्याने फस्त केल्याने नेवारे यांनी वन अधिकाऱ्यांना याची माहिती देत नुकसानभरपाईची मागणी केली आहे. बिबट्याने ज्या-ज्या ग्रामस्थांच्या घरातील कोंबड्या-बकऱ्या मारून फस्त केल्या त्या सर्व कुटुंबांना वन विभागाकडून मदत द्यावी. तसेच, दहशत पसरविणाऱ्या बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी बोंडगावदेवी येथील नागरिकांनी केली आहे.
हेही वाचा - दौरे थांबवा, मदत द्या : गोंदियातील शेतकऱ्यांना दीड महिना लोटूनही मदत नाही